जिल्ह्याच्या विकास प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवू-ना.केसरकर
नांदेड/प्रतिनिधी-नांदेड जिल्ह्यातील प्रलंबित विकास प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत ऑक्टोबर महिन्यात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना दिले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी आलेल्या राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषद,नांदेड व नागरी विकास कृती समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेवून नांदेडच्या प्रलंबित विकास प्रश्नांवर निवेदन दिले. या निवेदनात एन.टी.सी. टेक्सकॉम सुरु करावे, नांदेड मनपा घनकचरा व्यवस्थापनातर्ंगत सुरु असलेले काम समाधानकारक नसून कचर्याचे विभक्तीकरण व रिसायकलींग त्वरित करावी, गोदावरी नदीत मिळणार्या आठरा नाल्यांच्या पाण्याचे बंदीस्तीकरण करावे, बोंढार प्रकल्पाचे काम पूर्ण करावे, एनटीसीच्या जागी अद्यावत उद्योग सुरु करुन रोजगार निर्मिती करावी, लेंडी प्रकल्पाच्या कामासाठी कालबध्द कार्यक्रम घ्यावा, नांदेड शहर व जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील रिकाम्या प्लॉटस्वर तातडीने उद्योग उभारावेत, नांदेड-देगलूर-बिदर संकल्पित रेल्वे मार्गासाठी राज्यशासनाने केंद्राकडे आग्रह धरावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता. या संदर्भात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक लावू, असे आश्वासन ना.केसरकर यांनी यावेळी दिले.
या निवेदनावर माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील, कॉ.के.के.जांबकर, इंजि.द.मा.रेड्डी, प्रा.उत्तम सुर्यवंशी, प्रा.सुलोचना मुखेडकर, सुर्यकांत वाणी, संभाजीराव शिंदे, डॉ.किरण चिद्रावार, प्रा.पुरन शेट्टीवार आदींच्या स्वाक्षर्या आहेत