नवीन मुजळगा येथील शिवाजी यादव दरेगावे (सोनकांबळे) यांचा मुलगा तानाजी दरेगावे (वय – २१) व जळबा भुजंग मरतोळे (टोंम्पे) यांची मुलगी दिक्षा यांचे मागील एक- दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकमेकांचे नातलग असून ते एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुलीच्या घरची परिस्थिती जेमतेम तर मुलाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. गतवर्षी हेच प्रेमीयुगुल गावातून पळून गेले होते. यानंतर नातेवाईकांनी बैठक घेतली होती. मात्र मुलीच्या आई – वडिलांनी मुलाची हलाखीची परिस्थिती असल्याने या प्रेमविवाहास विरोध केला होता. आपले आई वडील कधीतरी आपल्या विवाहास संमती देतील या आशेत हे प्रेमीयुगल होते. मात्र, वर्ष उलटले तरी मुलीच्या घरच्यांचा विरोध कायम होता. त्यामुळे ३ ऑक्टोंबरला प्रेमीयुगल गावातून गायब झाले होते. आज सायंकाळी पाच वाजता एक गुराखी आपली जनावरे पाणी पाजण्यासाठी गावालगतच्या भेंड तलावात गेला असता, त्यास दोन मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसले. त्याने ग्रामस्थांना माहिती दिल्याने ही बाब उघडकीस आली. मात्र यावेळी मुलाचे आई – वडील मजुरी करण्यासाठी मलकापूर येथे गेले होते. सायंकाळी सहा वाजता पोलीस उपनिरीक्षक परशुराम मराडे हे घटनास्थळी दाखल झाले.
दोरी बांधून दोघांनी मारली तलावात उडी
घरच्यांचा विरोध कायम असल्याने आपला विवाह होऊन एकत्र राहणे तर शक्य नाही. किमान मेल्यानंतर तर एकाजागी राहावे या हेतुने या प्रेमी युगुलाने तलावात उडी मारण्यापूर्वी दोरीने बांधून उडी घेतली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे