नांदेड : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे असाच पराभव आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. याच कॉंग्रेसने यापूर्वी ‘वंचित’ म्हणजे भाजपची ‘बी टीम’ असा आरोप केला होता. त्याचा खुलासा करावा, नंतरच आघाडीची भाषा करावी, असा सल्ला ‘वंचित’चे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनुने यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे सज्ज असून, विधानसभेच्या राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे. विदर्भामध्ये नऊ जिल्ह्यांत आतापर्यंत ६१५ इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आता मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु आहे. “प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांचे सदस्यही ‘वंचित’च्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप, शिवसेनेच्या सदस्यांचा समावेश अत्याधिक आहे. त्यातच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसच्याच एका नगरसेवकाने वंचितची उमेदवारी मागितली आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघासाठी तेथील कॉंग्रेस नगरसेवकाने अर्ज केला आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघातून समीर कुलकर्णी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकानेही ‘वंचित’कडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात आपण लढू इच्छितो, असेही समीर यांनी सांगितले आहे. .”
लोकसभेवेळी नांदेड मतदारसंघात ‘एमआयएम’च्या नेत्यांनी लक्ष न दिल्याने मुस्लिम बांधवांची मते ‘वंचित’ला मिळाली नाहीत हे सत्य आहे का, यावर ‘वंचित’च्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील म्हणाले, “तसे काही नाही. एमआयएमच्या नेत्यांनी पुष्कळ मेहनत घेतली; परंतु कॉंग्रेसच्या नेत्यांनी मतदारांना भाजपचे भय दाखवून विषारी प्रचार केला. त्यामुळे मुस्लिमांची मते ‘वंचित’ला मिळाली नाहीत. विधानसभेच्या जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतून ११० जणांनी मुलाखती दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
The post वंचितकडून अशोक चव्हाणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता! appeared first on Maharashtra Today.