परभणी(प्रतिनिधी)दि.06ः- दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी मराठवाडा विभागावर प्रांतीय भेदभाव करत असून रेल्वे सुविधांपासून वंचित करत आहेत, त्यामुळे विभागातील प्रवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या व विभागातील इतर सर्व रेल्वेच्या विविध मागण्यांसंदर्भात द म रे चे नवनियुक्त महावस्थापक गजानन मल्ल्या यांच्याशी सिकंदरबाद येथे दि. 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजता मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्रा. सुरेश नाईकवाडे, फिरोज आली इत्यादींनी सविस्तर चर्चा करून मागणीचे एक निवेदन सादर करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने पूर्णा, मनमाड मार्गे नांदेड-मुंबई, आणि अकोला-मुंबई, नांदेड-कटरा सुपरफास्ट (वैष्णोदेवी) नांदेड-नई दिल्ली दरम्यान गरीब रथ, पूर्णा, अकोला मार्गे दैनंदिन औरंगाबाद-नागपूर, सोलापूर-नागपूर, नांदेड-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेसला दैनंदिन करणे, नांदेड-औरंगाबाद नवीन डेमो लोकल, अमरावती-पुणे आणि नागपूर-कोल्हापूर साप्ताहिक गाड्यांना दैनंदिन करणे, सोबत विभागात गरज असलेल्या मनमाड, नासिक, मुंबई, पुणे, गोवा, बिकानेर इत्यादी उन्हाळी विशेष गाड्यांची मागणी केली.
मराठवाडा विभागात नांदेड ते मनमाड मार्गावर सर्वात जास्त प्रवाशी वर्दळ आणि सर्वात जास्त मिळकत असताना देखील या मार्गावरील प्रवाश्यांवर कसा अन्याय केला जातो हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. औरंगाबाद येथून सकाळी 4 च्या देवगिरी आणि दुपारी 12 ची सचखंड एक्सप्रेस यामध्ये गाड्या नसल्याने सकाळी 7 ला औरंगाबाद येथून नांदेडला तसेच परतीत नांदेड येथून सकाळी 10.30 च्या तपोवन आणि संध्याकाळी 5 ची नंदिग्राम या दरम्यान गाडी नसल्याने नांदेड येथून औरंगाबादला दुपारी 2 वाजता डेमो लोकल चालविण्याबाबत मागणी केल्यावर महाव्यवस्थापकांनी या बाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन या बाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येईल, नवीन नांदेड-मुंबई रेल्वे बाबत परत एकदा मध्य रेल्वेशी चर्चा करून रेल्वे बोर्डाकडून मंजुरी घेऊ, सर्व अडचणीनां दूर करून नांदेड-पनवेलला दररोज चालविण्याची हमी दिली. तसेच औरंगाबाद-नागपूर नवीन रेल्वेसाठी प्रयत्न करू असे उत्तर दिले.
मराठवाडा एक्सप्रेस आणि तपोवन एक्सप्रेसने दररोज हजारो प्रवाशी उभे राहून जातात. मागील अनेक वर्षांपासून मराठवाडा आणि तपोवन एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रत्येकी पाच-पाच अतिरिक्त कोचेस कायमस्वरूपी जोडण्याची मागणी असताना सदर दोन्ही रेल्वे गाड्यांना फक्त 16-16 कोच जोडण्यात आले असून तत्काळ दोन्ही रेल्वे गाड्यांत कोचेस वाढविण्याची मागणी अरुण मेघराज, प्रा सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, डॉ. राजगोपाल कालानी, रितेश जैन, सांबानाथ काळे, हर्षद शहा, शंतनु डोईफोडे, उमाकांत जोशी, किरण चिद्रवार, अमित कासलीवाल, प्रवीण थानवी, दयानंद दीक्षित इत्यादींनी केली आहे.