आ. चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश, रब्बी पिकासाठी विष्णूपुरीतून दोन पाणी  पाळी सोडण्याचा निर्णय

 नांदेड/प्रतिनिधी-जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता रब्बी हंगामासाठी विष्णुपुरीतून पाण्याचे दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या बैठकीत मुंबई येथे घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
यावर्षी नांदेड जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरीप हंगाम पुरता धोक्यात आला आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकासाठी केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक नियोजन आता रब्बी हंगामावरच अवलंबून आहे. ऑक्टोबर हिटची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उन्हाळा सदृष्यपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. विष्णूपुरी धरणाच्या लाक्षक्षेत्रातील शेतकर्‍यांना रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी  विष्णुपुरीतून रब्बी पिकांना पाणी मिळणे अत्यावश्यक होते. शेतकर्‍यांची ही अडचण लक्षात घेऊन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करुन मंगळवारी मंत्रालयातील ना.महाजन यांच्या दालनात विष्णूपुरी कालवा समितीची बैठक घडवून आणली.
 या बैठकीत रब्बी हंगामासाठी विष्णुपुरीतून दोन आवर्तन सोडण्याची मागणी आ. चिखलीकर यांनी लावून धरल्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी रब्बी हंगाम पिकासाठी धरणातून दोन पाणी पाळी सोडण्याचा निर्णय घेवून पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश बैठकीतच जारी केले आहेत. या बैठकीतील निर्णयानुसार, पाण्याची पहिली पाळी 15 नोव्हेंबर आणि दुसरी पाळी डिसेंबर महिन्यात सोडण्याचा शासन निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. विष्णुुपुरीच्या लाभक्षेत्रातील सोनखेड, मारतळा, वाका आदि गावातील शेतकर्‍यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. विष्णूपुरी धरणाची निर्मितीच शेतीच्या सिंचनासाठी करण्यात आल्याची बाब आ. चिखलीकर यांनी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून देवून यंदा विष्णूपुरी हे धरण भरल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडून शेतकर्‍यांना न्याय दिला पाहिजे असा आग्रह धरला. या धरणातून रब्बी हंगामासाठी दोन पाणी पाळी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांनी घेतल्यामुळे अनेक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून आ. चिखलीकर यांनी पाठपुरावा करुन पाणी पाळी उपलब्ध करुन दिल्याबद्दल सोनखेड, मारतळा परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मंगळवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबने, वसंतराव चव्हाण, नागेश पाटील, हेमंत पाटील, मुख्य अभियंता कोहीरकर, अधिक्षक अभियंता सबीनवार, कार्यकारी अभियंता पत्तेवार, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता व कालवा समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
Leave a comment