किनवट: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या

0 7

IMG-20181016-WA0013

किनवट,दि. 16 (प्रतिनिधी) :  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नी झोपेत असतांना तिच्या डोक्यात, कपाळावर व गालावर कुर्‍हाडीने मारून तिला जिवानिशी ठार मारले. त्यानंतर स्वत: विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, ही दुर्देवी घटना किनवट तालुक्यातील मारेगांव (वरचे) येथे मंगळवारी (दि.16) पहाटे 2 ते 2.30 दरम्यान घडली.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किनवटच्या उत्तरेस 15 कि.मी. अंतरावरील मारेगांव (वरचे) येथील रहिवासी व मजुरी व्यवसाय करणारे चंद्रशेखर चंपतराव वाघमारे (वय 39) यांचा विवाह 1997 साली सावित्राबाईंशी झाला. त्यानंतर त्यांना दोन मुली व एक मुलगा असे तीन अपत्य झालेत. सर्वात लहान असलेल्या मुलाचे वय 11 वर्षाचे आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रशेखर आपली पत्नी सावित्राबाईच्या (वय 35) चारित्र्याविषयी सातत्याने संशय व्यक्त करीत असे. त्यावरून त्यांचे वादही होत असत. मानगुटीवर बसलेल्या या संशयपिशाच्चाने अखेर चंद्रशेखरची मती कुंठित केल्यामुळे, मंगळवारी त्याने अखेर संधी साधून, पत्नी सावित्राबाई झोपेत असतांना तिच्यावर पहाटे 2 ते 2.30 दरम्यान कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला. तिच्या डोक्यात, कपाळावर व गालावर वार केल्यामुळे ती बिचारी जागीच गतप्राण झाली. त्यानंतर तो घाबरल्याने वीज प्रवाहित वायरला स्पर्श करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, फक्त झटकाच लागल्याने वाचला.माहूर तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील रहिवासी चंद्रकांत रामराव लोखंडे (वय 23)  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलीस स्टेशनला गु.र.क्र.237/18 कलम 302 भा.दं.वि.प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि.दिलीप तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. विजय कांबळे करीत आहेत