घरातला टीव्ही पाहणेही महागणार, महिन्याला कमीत कमी ‘एवढे पैसेे’ द्यावे लागणार

0 23

नवी दिल्ली – तुमच्या आमच्या घरातील टीव्ही पाहणेही आता महाग होऊ शकते. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर कंपन्यांनी टीव्हीवरील चॅनेल्स प्रसारणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या पुरविण्यात येणाऱ्या मोफत चॅनेल्सवर यापुढे पैसे द्यावे लागतील. सध्या मोफत असलेल्या किंवा 130 रुपयांत मिळणाऱ्या 100 चॅनेल्सच्या बेसिक पॅकेजसाठी यापुढे कमीत कमी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना, आता टीव्ही पाहण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर कंपन्यांकडून घेण्यात येणार हा निर्णय ट्रायच्या नियमाचे उल्लंघन करणारा आहे. ट्रायने 27 डिसेंबरपर्यंत सर्वच डीटीएच कंपनींना 130 रुपयांत 100 चॅनेल्स दाखविण्याचा आदेश जारी केला होता. त्यामध्ये लोकांच्या पसंतीच्या चॅनेल्सचाही समावेश आहे. मात्र, ट्रायच्या या आदेशाला स्टार इंडियाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यानच्या काळात, इतर प्रमुख नेटवर्क म्हणजेच सोनी, जी वायकॉम 18 आणि स्टारने आपल्या सर्वच फ्री-टू-एअर (एफटीए) चॅनेल्संची मोफत सेवा बंद केली आहे. बेसिक पॅकेजमध्ये 100 चॅनेल्स दाखविण्याचा निर्णय ट्रायकडून घेण्यात आला होता. मात्र, यापुढे एफटीए चॅनेल्संना पे चॅनेल्समध्ये बदलणार असल्याचे या ब्रॉडकास्टर कंपन्यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला कंपनीची आर्थिक उलाढाल वाढवायची आहे. तर ग्राहकही मोफत चॅनेल्समुळे इतर पे चॅनेल्स पाहात नसल्याची ओरड कंपन्यांनी केली आहे.

News by lokmat.com