२० वर्षानंतर सचखंड एक्सप्रेसला नवीन डब्बे

DSC_0054

नांदेड – नांदेड ते अमृतसर दरम्यान धावणारी सचखंड एक्सप्रेसला २० वर्षांनंतर नवीन प्रणालीचे डबे जोडण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाची सर्वात यशस्वी रेल्वेगाडी म्हणून सचखंड ओळखली जाते. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता श्री हजुरसाहिब रेल्वे स्थानकावरुन (नांदेड) नवीन डब्यांचे पांघरण घालून सचखंड एक्सप्रेस अमृतसरच्या दिशेने रवाना झाली.यावेळी गाडीला फुलांनी सजवून जल्लोषात हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेडचे महापौर शिलाताई किशोर भवरे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी डी.पी.सिंघ, गुरुद्वारा अधीक्षक गुरींदरसिंघ वाधवा, नगरसेविका प्रकाशकौर खालसा, जसपालसिंघ लांगरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.गुरुवारी रवाना झालेल्या गाडीला जर्मन तंत्रज्ञानाने निर्मित २२ नवे डबे लावले गेले. त्यात एसी-२ चा एक डब्बा, एसी-३ चे चार डबे, जनरल स्लीपरचे बारा डबे, दोन जनरल डबे, एक पॅन्ट्री कार, एक सुरक्षा रक्षकांचा कोच व पार्सल कोच अशी डब्यांची रचना होती. नवीन डब्यात बसण्यासाठी आरामदायक आसन, प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जर, शौचालय, वॉश बेसिन, हॅंगर, अग्निसुरक्षा किट, डिजिटल डिस्पले आदीं सुविधांचा समावेश आहे.
नवीन डब्यांमुळे आता सचखंड एक्सप्रेसमध्ये १३४ प्रवाशांची क्षमता वाढली आहे. वातानुकूलित कोचेसमध्ये लक्झरी असा अनुभव मिळणार आहे. पंजाबहून आलेल्या सर्व प्रवाशांनी नवीन डब्यांचे कौतुक केले आहे.नांदेड आणि अमृतसर दरम्यानचा प्रवास २००० किलोमीटरचा आहे. तेव्हा नवीन तंत्रज्ञानामुळे आता प्रवाशांना आरामदायक यात्रा अनुभवयला मिळेल, असे रेल्वे एडीआरएम विश्वनाथ यांनी सांगितले. गुरुद्वाराचे प्रशासकीय अधिकारी डी.पी.सिंघ यांनी रेल्वे बोर्डाचे आणि नांदेड रेल्वे डिवीजनचे आभार मानले.

Leave a comment