राहुल गांधी थोडक्यात बचावले’रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट

भोपाळ: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शो दरम्यान फुग्यांचा स्फोट झाल्यानं काही वेळ कार्यकर्ते आणि उपस्थितांमध्ये घबराट पसरली. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. राहुल गांधी जबलपूरमध्ये रोड शो करत असताना हा प्रकार घडला. मध्य प्रदेश दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा शनिवारी जबलपूरमध्ये रोड शो होता. यावेळी राहुल गाडीतून उपस्थितांना अभिवादन करत होते. यावेळी एक कार्यकर्ता फुगे घेऊन काही अंतरावर उभा होता. तर दुसरा एकजण आरतीचं ताट घेऊन राहुल गांधींच्या वाहनाजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात आरतीचं ताट फुग्यांजवळ आलं आणि स्फोट झाला. यामुळे काही काळ घबराट पसरली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. स्फोट होताच राहुल गांधीदेखील थोडे मागे सरकले. नेमकं काय घडलं आहे, हे काही वेळ कोणाच्याच लक्षात आलं नाही. यानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस आणि एसपीजींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ‘फुग्यांचा स्फोट झाल्यानंतर आम्ही परिस्थितीचा आढावा घेतला. सुरक्षेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या. कोणालाही इजा झालेली नाही,’ अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अमित सिंह यांनी दिली.

Leave a comment