आंबेडकर-ओवेसी आघाडी नेमकी कोणाच्या फायद्याची ?

अशोक गव्हाणे

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन राजकीय समीकरण उदयास आलं आहे, ते म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम आणि प्रकाश आंबडेकर यांचा भारिप बहुजन महासंघ या पक्षांची युती. या युतीला वंचित बहुजन आघाडी असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आता प्रकाश आंबेडकरांकडून राजू शेट्टी यांचा स्वाभीमानी शेतकरी पक्ष ही सामील करून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. साहजिकच, या युतीबद्दल वेगवेगळ्या चर्चा समाजात आणि राजकीय वर्तुळात होत आहेत. काही आंबेडकरी कार्यकर्ते आणि एमआयएम समर्थक यांच्या मते ही युती हा एक सशक्त पर्याय होऊ शकते, तर काही आंबेडकरी गट आणि मुस्लिम या युतीच्या विरोधात भूमिका घेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांनीही या युतीवर भाजपची बी-टीम म्हणून टीका केली. आहे तर शिवसेनेने प्रकाश आंबेडकरांनी एमआयएमसोबत न जाता शिवसेनेसोबत यायला हवे असे मत व्यक्ते केले आहे.

राजकीय वर्तुळात या आघाडीवर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असली तरी ही आघाडी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणाच्या फायद्याची ठरेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे. परंतु एकूण राजकीय गोष्टींचा आणि राज्यातील मदारांच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास प्रामुख्याने हेच लक्षात येते की, याचा थेट फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. कारण; जी भाषा हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, भाजप, शिवसेना बोलतात तीच भाषा मुस्लिमांच्या बाजूने ओवेसी बंधू आणि त्यांचा पक्ष बोलत असतो, आणि तीच भाषा आता बहुजनांच्या नावाखाली दलितांच्या बाजूने प्रकाश आंबेडकर बोलताना दिसत आहेत. हिंदू कट्टरपंथी राजकारण असो व मुस्लिम कट्टरपंथी राजकारण असो हे नेहमी एकमेकांना पुरकच राहिलेले आहे. हे कट्टरपंथी राजकारण देशाला विनाशेच्या गर्तेत आणि अराजकतेच्या दरीत घेऊन जाणारे असले तरी, याचा मात्र परस्परांना राजकीय फायदा उठवता आला आहे, हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

बहुजन वंचित ही आघाडी तयार होऊन महाराष्ट्रात नवी तिसरी ताकदच उदयाला येत आहे. याचा थेट परिणाम असा होण्याची शक्यता आहे की, कट्टर हिंदुत्ववादाचा मुद्दा रेटत असताना ज्या मुस्लिमांची मते कधीच भाजप किंवा शिवसेनेला मिळू शकत नाहीत, ती मते थेट ओवेसी यांच्या एमआयएमला जातील. परंतु, तिथेच ती मते जर एमआयएमचा किंवा अन्य कुठला ठोस पर्याय नसेल तर सहाजिकच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, दलित आणि मुस्लिम मतदार हा कायम उंभरठ्यावर राहणारा मतदार आहे. छोट्या छोट्या अस्मितेच्या विषयावर तो एखाद्या पक्षाकडे वळवला जाऊ शकतो. याच कारणाने मोठ्या प्रमाणात तो या आघाडीकडे वळल्यास याचा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तोटा होईल.

पुरोगामी वर्तुळात आणि डाव्या पक्षांनी या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले असले तरी, प्रतिक्रिया संमिश्र आहेत. परंतु एकूणच राजकीय समिकरणांचा विचार केल्यास कट्टरपंथी राजकारणाचा फायदा नेहमी कट्टरपंथी पक्षांलाच होतो. त्याचबरोर, ही तिसरी आघाडी काँग्रेसप्रणित महाआघाडी करण्यासाठी तयार असल्याचे प्रकाश आंबेडकर सांगतात परंतु, एमआयएम या पक्षाला सोबत घेऊन काँग्रेसला हिंदु मतदार दुखवायचा नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर व एमआयएम काँग्रेसच्या महाआघाडीचा घटक होण्याची शक्‍यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात इतिहासाचा दाखला द्यायचा झाल्यास 2009 च्या विधानसभा निवडणुकामध्ये मनसेचा फॅक्टर मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला होता. 2009 मध्ये मनसेने भाजप आणि शिवसेना युतीची मते घेतलेली पहायला मिळाली होती. 40 ते 45 विधानसभेच्या अशा जागा होत्या जिथे मनसे आणि युतीच्या उमेदवाराची मते एकत्र केल्यास विजयी उमेदवारापेक्षा मतांची संख्या जास्त होती. याचा अप्रत्यक्षरित्या फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला झाला होता. यामुळे त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आघाडी सरकारविरोधांत लोकांमध्ये रोष असतानादेखिल आघाडी सत्तेत आली होती. यावेळीही तेच समीकरण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बाबतीत झालेले पहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्येच, राजू शेट्टींचा पक्ष या बहुजन वंचित आघाडीसोबत गेल्यास या आघाडीला आणखीणच बळकटी येईल.

एकूणच काय तर, जातीयवादी प्रचाराच्या विरोधात आवाज करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी भाजपविरोधी मतांच्या विभागणीचे परिणाम माहीत असूनही त्याकडे केलेले स्पष्ट दुर्लक्ष दिसते.
ओवेसी यांचे राजकारणही आंबेडकर यांच्याच धर्तीवर भाजपला मदत होणारे आहे. यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारंभार उमेदवार उभे करून, तेथील मुस्लिम मतांचे विभाजन घडवून आणले होते आणि ते अर्थातच भाजपच्या पथ्यावर पडले होते. खरं तर हे दोन्ही “छुपे रुस्तुम’ एकत्र येत असल्यामुळे त्यांची ताकद आणखीनच वाढली आहे, याचा थेट फायदा निश्चितच सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाच होणार आहे.

artical by http://www.esakal.com/

Leave a comment