गेली पाच ते सहा वर्षापूर्वी नांदेड ते नागपूर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विकासाभिमुख अजेंड्यामुळे हा महामार्ग बांधणीसाठी कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर झाला होता. यातील अर्धापूर ते नांदेड रस्ता माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार अमिता अशोक चव्हाण यांच्या लोकसभा आणि विधानसभा मतदार संघातील आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते. परंतु, कोट्यावधी रूपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या रस्त्यावर केवळ वर्षे, सहा महिन्यातच मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची पुरती चाळण झाली आहे.तसेच भोकर रोडचे नुतनीकरणाचे काम सुरू असताना अर्धवट काम सोडून हा गुत्तेदार पळून गेला आहे. त्यातच पावसामुळे मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवीणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. याबाबत गुत्तेदार आणि संबधित अधिकाऱयांवर कार्यवाही करण्याऐवजी भाजप सरकारनेही आपल्या मर्जीतील गुत्तेदार सण्यासाठी वेळोवेळी रस्ता दुरूस्तीच्या नावाखाली कोट्यावधी रूपयाच्या निधीचा चुराडा केला. मात्र, अद्यापही हा रस्ता दुरूस्त झालेला नाही. असे एका सामाजिक कार्यकर्त्याने ईटीव्हीशी बोलताना सांगितले.
रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी वाहन चालक दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेने व नागमोडी वळणे घेवून खड्ड्यातून रस्ता शोधत वाहने चालवित आहेत. तरीही दररोज एक ना एक अपघात होतोच. या अपघातात कित्येकांना आपला जिव गमवावा लागला आहे. तर, अनेकांना कायम स्वरूपी अपंगत्व आलेले आहे. काही दिवसांपुर्वी अशाच प्रकारे विरूध्द दिशेने येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला जोराची धडक देवून दाभड येथील दोन युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक छोटे – मोठे अपघात होवून अनेकजण जखमी झाले आहेत. तरीही या रस्त्याची दुरूस्ती होत नाही. याकडे शासनासह स्थानिक लोकप्रतिनिधीनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. तर अर्धापूर – नांदेड व भोकर-नांदेड रस्ता अजून किती जणांचे बळी घेणार? याची दुरूस्ती होणार की नाही? हा महामार्ग आहे की यमसदनाचा रस्ता? हाच प्रश्न वाहन धारकासह नागरिकांना पडला आहे.