राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समार्फत चौकशी कराः मल्लिकार्जुन खर्गे

राफेल घोटाळ्यांतील दोषींवर कारवाई झाल्याशिवाय संघर्ष थांबवणार नाहीः खा. अशोक चव्हाण

मुंबई दि. २७ सप्टेंबर २०१८.राफेल विमान खरेदीत मोठा घोटाळा आहे त्यामुळेच सरकार राफेल विमानाची खरेदी किंमत जाहीर करत नाही. राफेल खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

राफेल विमान खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आज महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा भव्य मोर्चा काढला. ऑगस्ट क्रांती मैदानात छोटेखानी सभेने या मोर्चाची सांगता झाली. यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले की ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणत मोदींनी गेल्या साडेचार वर्षात भरपूर खाल्ले असून आपल्या उद्योगपती मित्रांनाही खाऊ घातले आहे. मोदीजी मोठं-मोठ्या गोष्टी करतात पण देशात वाढणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल, राफेल विमान खरेदी व्यवहाराबद्दल, महिलांवरील अत्याचाराबद्दल, अल्पसंख्यांक आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल कधीही काहीच बोलत नाहीत. जे काही बोलतात ते लोकांचे मन विचलित करण्यासाठीचे नवीन नवीन जुमले असतात. राफेल घोटाळा हा या देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना विचारायचे आहे की, जर तुम्ही म्हणता की राफेल विमान खरेदी व्यवहार पारदर्शक आहे, प्रामाणिकपणाने देशाच्या हितासाठी केलेला व्यवहार आहे, मग तुम्ही या खरेदी व्यवहाराचे मूल्य का सांगत नाहीत? आम्ही त्यांना संसदेत विचारले की, या राफेल विमान खरेदी व्यवहाराची खरी किंमत जाहीर करा पण ते करत नाहीत. काँग्रेस सरकारने एका राफेल विमानाची ५६० कोटी रूपये ठरवली होती पण भाजप सरकारने हीच विमाने प्रत्येकी १६५० कोटी रुपये दराने विकत घेतली. या खरेदीत ४१, २०५ कोटी रुपये जास्त मोजले. ही विमाने मूळ किमतीपेक्षा तिप्पट दराने विकत घ्यायचे कारण काय? असा सवाल करून मोदी उद्योगपतींच्या हितासाठी देश चालवित आहेत, मोदींनी राफेल डील देशहितासाठी नाहीतर अंबानीच्या फायद्यासाठी केली आहे असे खर्गे म्हणाले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. चव्हाण म्हणाले की, राफेल विमान खरेदी घोटाळ्याची व्याप्ती दीड लाख कोटींची आहे. खरेदीत मोठा घोटाळा केला आहे म्हणूनच सरकार राफेल खरेदीची किंमत जाहीर करत नाही. राफेल विमान खरेदीच्या घोटाळ्याविरोधात काँग्रेस पक्षाने महालक्ष्मी रेसकोर्स ते ऑगस्ट क्रांती मैदान असा मोर्चा काढला आहे. याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला चले जाव चा नारा दिला होता. आज याच मैदानावरून आम्ही भाजप सरकार चले जाव असा नारा देत आहोत. राफेल विमान घोटाळ्यातील पैसा या देशातील जनतेचा पैसा आहे. भाजप सरकार राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत, लोकसभेमध्ये खोटे बोलत आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखरच प्रामाणिक आहेत, त्यांचे सरकार जर खरोखरच प्रामाणिक आहे तर संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी. काँग्रेस पक्षाने या घोटाळ्याविरोधात आंदोलन तीव्र केले असून या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करून दोषींना शिक्षा होईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.

ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनीही केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे मा. राज्यपालांची भेट घेऊन राफेल खरेदी व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समिचीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

या शिष्टमंडळात खा. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, संजय निरूपम, आ. नसीम खान, हर्षवर्धन पाटील, आ. विश्वजीत कदम, आ. अमीन पटेल, आ. सुनील केदार, बाबा सिद्दीकी, कृपाशंकर सिंग, सचिन सावंत, पृथ्वीराज साठे आदी नेते सहभागी होते.

आजच्या या विशाल मोर्चामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुआ, सोनल पटेल, माजी मंत्री सुरेश शेट्टी, नसीम खान, वर्षा गायकवाड, कृपाशंकर सिंग, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार एकनाथ गायकवाड,आमदार शरद रणपिसे, अस्लम शेख, माजी आमदार चरण सिंग सप्रा, मधू चव्हाण, बलदेव खोसा, बाबा सिद्दीकी, अशोक जाधव, अलका देसाई, जिल्ह्ध्यक्ष सुनील नरसाळे, हुकुलराज मेहता, जिया उल रहमान, अशोक सुत्राळे आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, महिला काँग्रेस अध्यक्षा अजंता यादव, एससी सेलचे अध्यक्ष कचरू यादव यांच्यासह हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading