नांदेड – किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या दुर्गानगर तांडा येथील रहिवासी असलेल्या तरुण व तरुणीचा मृतदेह मिळाल्याची घटना घडली आहे. गावालगतच असलेल्या लिंबाच्या झाडाला एकाच दोरीने लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तेलंगणा राज्यात निजामाबाद या ठिकाणी अक्षय वसंत राठोड हा तरुण पेंटीगचे काम करुन आपली उपजीविका भागवत होता. सदरील तरुण १७ ऑक्टोंबर रोजी दसरा सणानिमित्त दुर्गानगर तांडा या ठिकाणी आला होता. या तरुणासह याच गावातील अश्विनी बाबु राठोड (१८) हिचा मृतदेह गुरुवारी सकाळी दुर्गानगर तांडा रोडच्या गावालगत असलेल्या संतोष मंगल यांच्या शेतामध्ये लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले. गावातील एका महिला सकाळी शौचालयास गेली असता तिला हे मृतदेह निदर्शनास आले.सदरील महिलेने गावकऱयांना माहिती दिल्यानंतर नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळवली. इस्लापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी कर्मचाऱयांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृत तरुण व तरुणीचा मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला. सदरील मृतदेह शवविच्छेनासाठी शिवणी येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.