काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या संपर्कात, लवकरच होणार चर्चा – अशोक चव्हाण
आघाडीसाठी काँग्रेसकडून आलेल्या निमंत्रणांबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली नुकतीच भुमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस सोबत चर्चेची दारे खुली असल्याचे आंबेडकर एका वृतवाहिनीवर बोलताना म्हणाले होते. आंबेडकरांच्या या भूमिकेचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वागत केले आहे. तसेच चर्चेसाठी आम्ही सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.काँग्रेस पक्ष आणि विरोधीपक्ष नेते विखे पाटील आंबेडकरांच्या संपर्कात असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले. त्यांना भेटून चर्चेचे निमंत्रणही दिले आहे. बारा जागांची मागणी आंबेडकर यांनी केली. मात्र, जागावाटपबाबत आताच काही बोलणे उचित नाही. हा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमेटी घेत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर जागांबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. आघाडीत एमआयएम सोबत असणार का?, असा प्रश्न विचारला असता आंबेडकरांशी चर्चा झाल्यावर यावर प्रतिक्रिया देणार आहे. पक्षाची भूमिका माध्यमातून सांगनार नाही. थेट चर्चेत प्रकाश आंबेडकर यांना सांगू असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. दलित आघाडी व मुस्लिम आघाडी यांना सोबत घेऊन काँग्रेस एक पत्ता फेकनार असे संकेतही त्यांनी यावेळी दिले आहेत.