व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीस सुरुवात ; जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रक्रियेची पाहणी करावी

नांदेड दि. 24 :- व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रथमस्तरीय तपासणीसाठी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत शासकीय गोदाम खुपसरवाडी येथे भेट देवून या प्रक्रियेची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्याला एकूण 3 हजार 670 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. यापुर्वी बॅलोट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथमस्तरीय तपासणी 22 ऑक्टोंबर पासून खुपसरवाडी येथील शासकीय गोदामात सुरु झाली आहे.ही प्रथमस्तरीय तपासणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बँगलोर (BEL) येथील तज्ज्ञ अभियंते तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी / कर्मचारी आणि मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत होणार आहे. ही तपासणी 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत दररोज काम पूर्ण होईपर्यंत करण्यात येणार आहे.प्रथमस्तरीय तपासणीसाठी सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या कालावधीत शासकीय गोदाम मौजे खुपसरवाडी येथे भेट देवून या प्रक्रियेची पाहणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.

Leave a comment