नांदेड:पोलीस ठाण्यातच पती-पत्नीने विष घेतले; पतीचा मृत्यू

सततच्या भांडणामुळे पत्नी आश्विनी शिवशंकर पाटील या २७ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. याचदरम्यान शिवशंकर नरसिंगराव पाटील (वय ३४ ) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच विष घेतले. त्यानंतर त्यांची पत्नी आश्विनी यांनी सुद्घा विष घेतले.
शिवशंकर पाटील यांचा उपचारादरम्यान सोमवारी (३ डिसेंबर) साडेतीन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची आई शकुंतला नरसिंगराव पाटील (वय ६२ रा. वाल्मीक नगर, मुखेड ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुलगा शिवशंकर पाटील व त्याची पत्नी  अश्विनी पाटील यांच्यात सतत भांडण होत होती. त्यांचे पटत नव्हते त्यामुळे अश्विनी पाटील यांनी मुखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या. हे शिवशंकर पाटील यांना सहन न झाल्याने त्यांनी मुखेड पोलीस ठाण्याच्या आवारातच विषारी औषध घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती त्यांनी दिली.या फिर्यादीवरुन मृत्यूस कारणीभूत असल्याप्रकरणी आश्विनी पाटील यांच्यासह ९ जणांच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे आणि पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मृत शिवशंकर पाटील यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी नातेवाईकांनी मुखेड पोलीस ठाण्यात १ तास मृतदेह ठेवला होते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह उचलण्यात आला. मंगळवारी ( ४ डिसेंबर) ५ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
Leave a comment