हॉटेल कामगाराचा मुलगा ‘तौसीफ शहीद’, पुढील आठवड्यात रमजानसाठी मिळाली होती सुट्टी

पाटोदा (बीड) : गडचिरोलीच्या जाँबुळखेड येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद जवानांमधे पाटोदा येथील शेख तौसीफ शेख अरेफ (34) या जवानाचा समावेश अहे. तौसीफ शहीद झाल्याची महिती सायंकाळी शहरात मिळाली. काही क्षणात व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद करून तौसीफला श्रद्धांजली अर्पण केली. पाटोद्यात तौसीफ बिल्डर अशी त्यांची ओळख होती. आई वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन मुलं असा तौसीफचा परिवार आहे .शहीद जवान तौसीफ यांचे सामान्य कुटुंब असून वडील शेख अरेफ आजही हॉटेल कामगार म्हणून काम करतात. कामगारदिनी मुलगा देशसेवा करताना कामी आला. तौसीफ हे 2010 मधे गडचिरोली पोलीस दलात भरती झाले होते. 2011 मधे त्यांची नेमणूक झाली होती. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी सी-60 पथकात त्यांची नेमणूक होती. 1 मे रोजी पथक गस्तीवर असताना जाँबुळखेड जवळ नक्षलवाद्यानी पेरलेल्या भूसुरुंग स्पोटात 15 जवान शहीद झाले, त्यात तौसीफ या जवानाचा समावेश आहे.

 

सर्वसामान्य कुटुंबातील या जवानाचे वडील आरेफ आजही हॉटेल कामगार म्हणून काम करतात. आई शमीम घरकाम करत असून दोन भाऊ औरंगाबाद येथे खासगी नोकरी करतात. तौसीफ यांचे प्राथमिक शिक्षण येथील क्रांतीनगर प्राथमिक शाळेत झाले आहे. माध्यमिक शिक्षण वसंतराव नाईक विद्यालय तर बारावीपर्यंतचे शिक्षण पी.व्ही.पी. महाविदयालाय झाले. त्यानंतर, पाटोद्याच्या आय टी आय कॉलेजमध्ये पत्रे कारागीर असे प्रशिक्षण तौसीफने घेतले आहे. शहरात तौसीफ बिल्डर अशी त्याची ओळख आहे. तौसीफ यांची पुढील वर्षी बदली होणार होती, 2013 मध्ये त्यांचा शिबा उर्फ अंजुम यांच्याशी विवाह झाला. त्यांना मुहम्मद आणि तैमूर अशी दोन लहान मुले आहेत. तौसीफचे सासरे रफिक अहमद पठाण पाटोदा पोलिसात ए.एस.आय म्हणून कार्यरत आहेत. रमजानसाठी पुढील आठवड्यात ते सुट्टीवर गावी येणार होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. दुर्दैवाने आज नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात तौसीफ यांना वीरमरण प्राप्त झाले.