स्‍वच्‍छ भार‍त अभियानात सर्वांनी योगदान द्यावे  जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे प्रतिपादन

0 23

IMG-20180924-WA0013 (1)

स्‍वच्‍छता जनजागृती रॅलीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; कलापथकाचे सादरीकरण

नांदेड, 25- स्‍वच्‍छ भारत अभियानात महाविद्यालयीन युवक-युवती व शालेय विद्यार्थ्‍यांचा सहभाग महत्‍वाचा असून जोपर्यंत स्‍वच्‍छता हा आपल्‍या दैनंदिन कामाचा भाग होणार नाही तोपर्यंत आपला देश स्‍वच्‍छ होणार नाही. यासाठी आपले गाव व शहर स्‍वच्‍छ करण्‍यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.    स्‍वच्‍छता ही सेवा या विशेष पंधरवडयानिमित्‍त जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने सोमवार दिनांक 24 सप्‍टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता नांदेड शहरातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळयापासून स्‍वच्‍छता जनजागृती रॅली काढण्‍यात आली होती. या रॅलीचा समारोप कुसुम सभागृह येथे करण्‍यात आला, त्‍यावेळी ते बोलत होते. जिल्‍हा प‍रिषद अध्‍यक्षा शांताबाई पवार जवळगावकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात नांदेड वाघाळा शहर महानग‍रपालिकेचे आयुक्‍त लहुराज माळी, नांदेड जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेचे समन्‍वयक डॉ. डी. डी. पवार, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, जी.एल. रामोड, एस.व्‍ही शिंगणे, समाजकल्‍याण अधिकारी ए.बी. कुंभारगावे, प्राथमि‍क विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रभारी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. विद्या झिने, गट शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, कार्यकारी अभियंता मिलिंद गायकवाड, पी.एम. रायभोगे, जी. व्‍ही. गुरले, प्रा. डॉ. शिवराज बोकडे आदींची उपस्थिती होती.    पुढे ते म्‍हणाले, केंद्र शासनाच्‍या पेयजल व स्‍वच्‍छता मंत्रालयाच्‍या वतीने देशभरात स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान येत्‍या 2 ऑक्‍टोबर पर्यंत राबविण्‍यात येत आहे. यात शाळा-महाविद्यालयांनी सक्रिय सहभाग घेवून स्‍वच्‍छतेची नवक्रांती करण्‍यासाठी योगदान देण्‍याचे त्‍यांनी यावेळी आवाहन केले. प्रारंभी महात्‍मा गांधी, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा महाराज यांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन दीप प्रज्‍वलन करण्‍यात आले. त्‍यानंतर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने उपस्थित मान्‍यवरांचा बुके देवून सत्‍कार करण्‍यात आला. प्रारंभी शहरातील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळया पासून स्‍वच्‍छता जनजागृती रॅलीला सुरुवात करण्‍यात आली. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा शांताबाई जवळगावकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, वजीराबाद चौक, कलामंदीर, शिवाजी नगर, महात्‍मा फुले पुतळा मार्गे कुसुम सभागृहापर्यंत रॅली काढून स्‍वच्‍छतेची शपथ घेण्‍यात आली. यावेळी बोलतांना महापालिकेचे आयुक्‍त लहुराज माळी म्‍हणाले, जेवनापूर्वी साबणाने स्‍वच्‍छ हात धुणे आवश्‍यक आहे. हात न धुता खाल्‍यास अनेक आजार होऊ शकतात. त्‍यासाठी जेवनापूर्वी, शौचानंतर, बाळाला भरविण्‍यापूर्वी, स्‍वयंपाक बनवण्‍यापूर्वी आपले हात स्‍वच्‍छ धूणे आवश्‍यक आहे. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी मार्गदर्शन करतांना म्‍हणाले, पर्यावरणाच्‍या संवर्धनासाठी स्‍वच्‍छता महत्‍वाची आहे. तसेच घर आणि घराच्‍या आसपासचा परिसर नियमित स्‍वच्‍छ ठेवण्‍याची जबाबदारी ही सर्वांची आहे. यासाठी स्‍वच्‍छता ही सेवा या विशेष मोहिमेमध्‍ये सक्रीय सहभागी होऊन स्‍वच्‍छतेत नवे बदल घडविण्‍याचा संकल्‍प करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्‍वयक डॉ. डी.डी. पवार, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रभारी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. विद्या झिने यांनीही स्‍वच्‍छतेविषयी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्षाचे जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक मिलिंद व्‍यवहारे यांनी मानले.

स्‍वच्‍छता जनजागृती रॅलीत मोठया प्रमाणात जनजागृती करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने काढण्‍यात आलेल्‍या विविध घोषवाक्‍यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. गांधीजी का इरादा, देशवासी करें स्‍वच्‍छता का वादा, स्‍वच्‍छता का रखिए ध्‍यान, स्‍वच्‍छता से देश बनेगा महान, सांडपाण्‍याची योग्‍य विल्‍हेवाट, गावात येर्इल आरोग्‍याची पहाट, एकत्र करुनी कचरा, कंपोष्‍ट खड्डयात करु निचरा, गावकरी मिळून काम करु शौचालयाचा नियमित वापर करु, स्‍वच्‍छतेचे संदेश ध्‍यानी धरु, आरोग्‍य आपले निरोगी बनवू अशा विविध घोषवाक्‍यांची फलक आणि घोषणेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीत यशवंत महाविद्यालय, पिपल्‍स कॉलेज, सायन्‍स कॉलेज, आय.टी.एम. कॉलेज, अशोक माध्‍यमिक विद्यालय, अंध्रा समिती विद्यालय, पिपल्‍स हायस्‍कुल, के.आर.एम. महिला महाविद्यालय, महात्‍मा फुले हायस्‍कुल बाबानगर, जिल्‍हा परिषद हायस्‍कुल मुलांचे वजीराबाद, श्री शारदा भवन हायस्‍कूल, गुजराथी हायस्‍कुल, फजोलुउलूम हायस्‍कूल, अंबिका विद्यालय, नोबल हायस्‍कूल, खालसा हायस्‍कुल, शासकिय आद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शासकीय तंत्रनिकेतन, विधी महाविद्यालय, जिल्‍हा नांदेड स्‍काऊड गाईड कार्यालयाचे स्‍काऊड आणि गाईड, जिल्‍हा पाणी व स्‍वच्‍छता मिशन कक्ष, तालुकास्‍तरावरील समन्‍वय व समुह समन्‍वय यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.