नांदेड :रेल्वेत चोरी करणाऱ्या महिला चोरांची टोळी जेरबंद, ६ महिला ताब्यात

नांदेड – रेल्वेत प्रवाशांना लूटणाऱ्या महिला टोळीला लोहमार्ग पोलिसांनी पूर्णा स्टेशन येथून अटक केली. या कारवाईत ६ महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेनंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

रेल्वे प्रवासात बेसावध महिलांशी ओळख निर्माण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू, दागिने, पर्स लंपास करणारी महिलांची टोळी गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होती. औढा तालुक्यातील प्रवीण लोंढे हे आपल्या कुटुंबासह अकोला-परळी दरम्यान प्रवास करत होते. सर्वसाधरण डब्यात गर्दीचा फायदा घेत धामणी स्टेशनजवळ या टोळीतील महिलांनी त्यांच्या खिशातील पर्स काढून घेतली. आपल्या खिशातील पर्स चोरीला गेले, असे लक्षात येताच लोंढे यांनी पूर्णा पोलिसांशी संपर्क साधला. खिशातील पर्स चोरी गेल्याची तक्रार लोहमार्ग पोलिसांत दिली. यासंदर्भात नांदेड लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी लगेच पूर्णा येथे जाऊन तालुक्यातील कामलापूर येथून ६ महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत या महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेली लोंढे यांची पर्स व रक्कम पोलिसांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी आरोपी अंजली भोसले, राधिका भोसले, प्रीती शिंदे, राधा शिंदे, सोनू भोसले, अमीन भोसले या ६ महिलांवर गुन्हा दाखल करून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Leave a comment