वृत्तपत्रांच्या पडताळणीस स्थगिती देवून तपासणी केलेल्या वृत्तपत्रांची दरवाढ करा

नांदेडमधील वृत्तपत्र संपादकांची मागणी

नांदेड/प्रतिनिधी-अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने यांच्याकडून होणार्‍या वृत्तपत्रांच्या पडताळणीस स्थगिती द्यावी आणि यापूर्वी तपासणी केलेल्या वृत्तपत्रांच्या जाहीरातीची दरवाढ करावी. अशा मागण्या नांदेड येथील दै.प्रजावाणी, श्रमिक एकजूट, उद्याचा मराठवाडा, गोदावरी ऑबझर्वर, सायं दै.नांदेड वार्ता यांच्यासह अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांनी जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात वृत्तपत्रांच्या जाहीरातीच्या दरात वाढ करण्यात आली होती. पण त्यासाठी वृत्तपत्राचा खप, त्याचा आकार आदी निकष लावण्यात आले होते. त्या निकषानुसार राज्यातील वृत्तपत्रांची पहिल्या टप्प्यात पडताळणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही तपासणी झालेल्या वृत्तपत्रांची दरवाढ झाली नाही. किंवा तसा निर्णय देखील अद्याप झालेला नाही.

तरी सुध्दा अधिपरिक्षक पुस्तके व प्रकाशने यांनी तपासणीच्या दुसर्‍या टप्प्यात दरवाढ देण्यात आलेल्या वृत्तपत्रांच्या तपासणीची गरज नसतांना सुध्दा 10 डिसेंबर रोजी पुन्हा तपासणीचा आदेश दिला आहे. अधिपरिक्षकांनी राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकार्‍यांना पंधरा दिवसाच्या आत तपासणीसाठी सांगितले आहे. वास्तविक पाहता टप्पा क्र.1 मध्ये ज्यांची तपासणी झाली आहे व ज्यांना दरवाढ देण्यास सांगितले आहे त्यांच्या पुन्हा तपासणीची आवश्यकता नाही. त्यामुळे अधिपरिक्षकांची पडताळणीची सदर सूचना नियमबाह्य असल्याचे उपरोक्त वृत्तपत्रांच्या संपादकांनी निवेदनात नमूद केले आहे. या दुसर्‍या पडताळणीमुळे वृत्तपत्रांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. वास्तविक पाहता 17 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार दोन वर्षांनी म्हणजे जानेवारी 2021 मध्ये पडताळणी होणे आवश्यक आहे. असे असतांना टप्पा नं.2 मध्ये होणारी वृत्तपत्रांची होणारी पडताळणी स्थगित करावी, अशी मागणी या संपादकांनी केली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ज्यांना दरवाढ मंजूर केली आहे त्यांच्या दरवाढीची अंमलबजावणी करावी, अशी देखील मागणी संपादकांनी केली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील एका गणमान्य वृत्तपत्राचे संपादक आहेत. प्रसिद्धी माध्यमांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे वृत्तपत्राच्या अडचणी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. याबाबी लक्षात घेवून राज्यातील वृत्तपत्रांवर होणारा अन्याय मुख्यमंत्री महोदय दूर करतील, अशी अपेक्षा नांदेड मधील संपादकांनी व्यक्त केली आहे.

या निवेदनावर दै.प्रजावाणीतर्फे श्रीनिवास जाजू, श्रमिक एकजूटचे कृष्णा शेवडीकर, उद्याचा मराठवाडाचे राम शेवडीकर, गोदावरी अबझर्वचे अब्दुल मुक्तार, सायं दै.नांदेड वार्ताचे प्रदीप नागापूरकर, नंदीग्राम लोकक्रांती वार्ताचे धोंडोपंत विष्णुपूरीकर, गोदातीर समाचारचे केशव घोणसे पाटील, रिपब्लिकन गार्डचे विजय सोनवणे, वाचक मंचचे राजेश पटणे, नांदेड एकजूटच्या सौ.अनुराधा विष्णुपूरीकर, महासागर समाचारचे एन.एम.बेंद्रीकर, बहुरंगी वार्ताचे धम्मपाल नरवाडे, प्रभावचे डॉ.हकीम महंमदखान, गाववालाचे विजय दगडू आणि टाईम्स ऑफ गौरवचे विलास महाजन यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading