अकोला : वंचित बहुजन आघाडीची स्थापना जुलै 2018 मध्ये झाली. त्यानंतर काँग्रेसला 12 लोकसभा मतदारसंघाचा प्रस्ताव दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र चर्चेतून काँग्रेस `एमआयएम`च्या पलिकडे सरकली नाही. आता 30 जानेवारीपर्यंत काँग्रेसने निर्णय घेतला नाही तर 31 जानेवारीला श्रीरामपूर येथे बैठक घेवून वंचित बहुजन आघाडीचा पुढील दिशा जाहीर करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी (ता.23) अकोला येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले भारिप बहुजन महासंघाचा पंढरपूर येथे जुलै 2018 मध्ये मेळावा झाला होता.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून घेण्यात आलेल्या या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. या आघाडीत मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या घटकांना सोबत घेवून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यात येणार असल्याचे जाहीर केली होते. आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीने जुलैमध्ये काँग्रेसला 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. या बारा जागांवर काँग्रेसला मागील तीन निवडणुकांमध्ये एकदाही विजय मिळाला नाही आणि काही ठिकाणी तर त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा नाही. या जागा वंचित आघाडीला दिल्यानंतर विजयाचे ही आम्ही बघून घेवू, त्यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले जाणार नाही, असे प्रस्तावात नमूद असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.