विकासात जिल्हा वृत्तपत्रांचे महत्वपूर्ण योगदान-सदाशिवराव पाटील

नांदेड/प्रतिनिधी-जिल्हा व ग्रामीण विकासात छोट्या वृत्तपत्रांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केले.
सायं दै.नांदेड वार्ताच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन सदाशिवराव पाटील व माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते ऍड.व्यंकटराव करखेलीकर तर प्रमुख पाहुणे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे, सुराज्य सेनेचे फारुख अहेमद हे होते. यावेळी बोलतांना सदाशिवराव पाटील म्हणाले की, अलिकडच्या काळात जिल्हा व ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना मोठ्या वर्तमानपत्रात फारसे स्थान नसते. भांडवलदारांनी मोठी वृत्तपत्रे गिळकृंत केल्याने छोट्या व जिल्हा दैनिकांचे विकासाच्या प्रश्नावर मोठे योगदान निर्माण होत आहे. यावेळी डॉ.व्यंकटेश काब्दे म्हणाले की, दिवंगत स्वातंत्र्य सैनानी कॉ.अनंतराव नागापूरकरांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या नांदेड वार्ताने विश्वासाह्यर्तसोबतच आपल्या ध्येयधोरणांचा जिद्दीने पाठपुरावा केला. त्यामुळे नांदेड वार्तासारखी छोटी वृत्तपत्रे नुसती टिकलीच नाही तर ती वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. ऍड. व्यंकटराव करखेलीकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात ध्येयाने प्रेरित होवून वृत्तपत्र चालवतांना अडचणींचा कसा सामना करावा लागतो याचे स्वअनुभव सांगितले. यावेळी प्रकाश कांबळे, फारुख अहेमद यांचीही भाषणेही झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक प्रदीप नागापूरकर यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन के.के.जांबकर यांनी केले. यावेळी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस सुभाष लोणे, उपाध्यक्ष लक्ष्मण भवरे, जि.प.चे जनसंपर्क अधिकारी मिलींद व्यवहारे, सुर्यकांत वाणी, राज गोडबोले, सुभाष काटकांबळे, नागोराव पुय्यड, धोत्रे, आनंदा बोकारे, इम्रान पठाण, आझमभाई, श्याम सोनकांबळे, गणेश संदुपटला, गोपाल केरमकोंडा, गौतम सुर्य, संजय लष्करे, नागसेन डोंगरे, केशव नवरे, के.एन.हटकर, कोंडीबा हटकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a comment