इंधन दरवाढी विरोधात ट्रॅव्हल्स 9 ऑक्टोबर ला बंद

परभणी – गेल्या काही महिन्यात पेट्रोल, डिझेलचे दर रोजच वाढत आहेत. त्यातच चालू महिन्यात तर सरकारने दरवाढीचा कळस गाठला आहे. 60-65 रुपये लिटरचे डिझेल चक्क 80 रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे या विरोधात परभणीत, नांदेेेड, हिंगोली जिल्ह्यासह परळी, अंबाजोगाई येथील ट्रॅव्हल्स मालकांनी मंगळवारी  (9 ऑक्टोबर) एक दिवसाचा बंद पुकारला आहे.  इंधन दरवाढीच्या बाबत दोन दिवसांपूर्वी ठोस पावले उचलण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारने 2 ते 5 रुपये दर कमी करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 90 पैसे भाव वाढवून दिलेली सवलत पुन्हा काढून घेतली. हा प्रकार म्हणजे कपडे काढून चड्डी परत करण्यासारखा आहे. दरम्यान, स्पर्धेच्या या युगात ट्रॅव्हल्स चालकांना मोठ्या कसरती कराव्या लागतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना, सोयी-सवलती, तिकीट दर कमी करून द्यावा लागतो. शिवाय परिवहन मंडळाचा मोठ्या प्रमाणात कर दरमहा नियमित भरावा लागतो. अश्या परिस्थिती डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅव्हल चालकांचे आर्थिक गणित पार कोलमडून गेले आहे. त्यांना सावरण्यासाठी डिझेलचे भाव कमी करणे आवश्यक आहे. शासनाच्या या दर वाढीचा निषेध आणि इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी उद्या मंगळवारी (9 ऑक्टोबर 2018) ट्रॅव्हल्स बंद ठेवण्याचा निर्णय ट्रॅव्हल्समालकांच्या संघटनेने घेतला आहे, अशी मागणी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे येथील मराठवाडा ट्रॅव्हल्स मालक संघटनेचे उपाध्यक्ष संभानाथ काळे, अप्पासाहेब जाधव, अब्दुला मकरानी, कमलकिशोर सारडा, सुयोग अंबिलवादे यांनी दिली आहे.
Leave a comment