ठाणे : राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शिक्षकांना या निर्णयाने दिलासा मिळाला असून, त्यांना शासनाने दिवाळीपूर्वीच ही भेट दिली आहे. या बदल्या शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. मात्र त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नसल्याने कौटुंबिक अडचणी वाढल्या. इतर कारणांमुळेही शिक्षकांनी बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्यासाठी ग्राम विकास विभागाने सुधारित धोरण हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्या रद्दकरण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.
ज्या शिक्षकाना आंतरजिल्हा बदल्या नको आहेत, अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये विविध अटी व शर्तींवर कायम ठेवण्याचे आदेश आहेत. दिवाळीच्या दीर्घ सुट्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये पाठविण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत.शिक्षकांना मूळ जिल्ह्यात जाण्यासाठीच्या अटी व शर्ती
संबंधित शिक्षकास अद्याप कार्यमुक्त केलेले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त करू नये. त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश सीईओ यांनी काढावेत.
कार्यमुक्त केलेले असल्यास वा त्यांना आंतरजिल्हा बदली नको असल्यास, त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जावयाचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे गरजेचे आहे.संबंधित शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्षे त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचाअधिकार राहणार नाही.
शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधित होणार नाही.