नांदेड – नवरात्रीनिमित्त शहरापासून जवळच असलेल्या रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका भक्ताचा कुंडात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमेश नारायण गरुडकर (20) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.लोहा तालुक्यातील वडेपुरीच्या डोंगरावर असलेल्या रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेडच्या चौफाळा भागातील रमेश हा त्याच्या मित्रांसोबत गेला होता. दर्शन घेण्यापूर्वी तो मित्रांसमवेत मंदीर परिसरात असलेल्या प्राचीन कुंडात पोहण्यासाठी उतरला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तो कुंडाच्या तळाशी जाऊन गाळात फसल्याने त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी बाहेर येऊन उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना व गोदा जीवरक्षक दलाच्या जवानाना सांगितले. सकाळी ९ वाजता ही घटना घडली त्यानंतर जीवरक्षक जवानांनी अथक प्रयत्न करुन तब्बल २ तासांनी त्याला बाहेर काढले.
मृत रमेश हा एकूलता एक मुलगा होता. तसेच तो एका दुकानावर कामाला जात होता. परंतु, त्याचा देवीच्या पायथ्याशी असलेल्या कुंडात बुडून मृत्यू झाल्याने देवस्थान व चौफाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस हवालदार एम. आर. इंगळे आणि श्रीकांत कांबळे यांनी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी सोनखेड ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.