नांदेड स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवर माजी महापौरांचा आक्षेप

नांदेड – महापालिकेच्या स्थायी समितीच्या नव्या आठ सदस्यांच्या निवडीला माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी आक्षेप घेतला. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ८ रिक्त झालेल्या जागांची निवड करण्यासाठी नोव्हेंबर २०१८ पर्यंत स्थायी समितीची सभा व सर्वसाधारण सभा घेणे आवश्यक होते. मात्र, या सभांची नोटीस एकाच दिवशी काढण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवड करण्याचा विषय पुरवणी विषयपत्रिकेत ठेवण्यात आला होता.

दरम्यान, याविषयी वर्तमानपत्रात माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, मनपा प्रशासनाने केली नाही. त्यामुळे सदरची पुरवणी विषय पत्रिका नियमानुसार नाही. तसेच नियोजित सभेच्या दिवशीच पुरवणी विषय पत्रिका प्रसिद्ध केल्यामुळे सदर विषय कायदेशीर ठरत नाही. महापालिकेच्या संकेतस्थळावर विषय सूची प्रसिद्ध केली, म्हणजे ती बाब कायदेशीर ठरत नाही, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
त्यामुळे ३० नोव्हेंबर २०१८ रोजीच्या सर्वसाधारण सभेत समितीच्या नवीन ८ सदस्यांची निवड बेकायदेशीर आहे. ही निवड प्रक्रिया विहीत मार्गाने करावी, अशी मागणी माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी केली. याप्रकरणी त्यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.
Leave a comment