कोल्हापूर : कोल्हापूरात कामानिमित्त राहणारे व बाहेरगावी असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक वेळा मृतदेह नातेवाईकांची वाट पाहात २४ तासांपर्यंत ठेवावा लागतो. अशा स्थितीत मृतदेह ठेवण्यासाठी शीत शवपेटीची (डेड बॉडी फ्रीजर) गरज असते. ही निकड लक्षात घेवून महापालिकेने तीन ठिकाणी पाच शीत शवपेट्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे मोफत अत्यंविधी सेवा पुरविली जाते. याजोडीला आता शीपेटीची सेवाही सुरु होत आहे. जगात कुठेही जगावे, परंतू मरावे कोल्हापुरात अशी करवीर काशीची मानवसेवेची ख्याती मृत्यूनंतरच्या नव्या उदात्तसेवेमुळे आणखी दृढ होईल.
खासगी दवाखान्यात मृत्यू झाल्यास त्या दवाखान्यातून तत्काळ मृतदेह नेण्यास नातेवाइकांना सांगितले जाते. मृतदेह घरी नेला तरी त्यावर तातडीने अंत्यसंस्कार होणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते; पण अनेक कुटुंबांत अजूनही बाहेर गावी असलेला मुलगा, मुलगी किंवा अन्य जवळचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार केले जात नाहीत. मध्यरात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी सर्वांना बोलावता येणे शक्य नसल्याने दुस-या दिवशी सकाळी अंत्यसंस्काराचे नियोजन केले जाते. अशा वेळी इतका वेळ मृतदेह कोठे ठेवायचा? ही मोठी समस्या असते. सीपीआरच्या शवागारात मृतदेह ठेवण्याची सक्षम यंत्रणा नाही. त्यामुळे बहुतेक वेळा मृतदेह कसबा बावड्यातील डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये ठेवावा लागतो. पुन्हा अंत्यसंस्कारासाठी तो मृतदेह घरी आणावा लागतो.
स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी शहरवासीयांची गरज ध्यानात घेवून बजेटमध्ये शीत शवपेटीसाठी १५ लाखांची तरतुद केली. आयसोलेशन हॉस्पिटल दोन पेट्या, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल दोन पेट्या, पंचगंगा हॉस्पिटल एक पेटी ठेवण्यात येणार आहेत.
सीपीआर किंवा महापालिकेत शीत शवपेटय़ा नसल्याने शहराबाहेर दूरवर मृतदेह नेणे जिकिरीचे होते. त्यातच मृतदेहाचे विच्छेदन झाल्यास ठरावीक वेळेनंतर मृतदेहाची हेळसांड होते, त्यातून दुगंधी पसरते.
सीपीआरमध्ये पोस्टमार्टम हाऊसमध्ये मर्च्युरी कॅबिनेट नसल्यामुळे मृतदेह सुरक्षित राहू शकत नाही. दुर्गंधीची समस्यासुद्धा निर्माण होते. त्यासाठी सीपीआरमध्ये सुसज्ज शीत शवपेट्यांची गरज आहे. महापालिकेने सुविधा उपलब्ध केल्याने गरजूंना याचा लाभ होईल. मृत्यूनंतर होणारी हेळसांड थांबणार आहे.
The post कोल्हापूर महापालिकेतर्फे शीत शवपेट्यांची सेवा appeared first on Maharashtra Today.