रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी – महापौर सौ.शीलाताई  भवरे

0 43

मालमत्ताधारकांना शास्ती माफीसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

नांदेड – नांदेड शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेकडून ७३३ लाभार्थ्यांना तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३७९१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून यानंतरही पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्यात येणार असल्याचे त्याचबरोबर शहरातील मालमत्ताधारकांना शास्ती माफीसाठी दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे यांनी माहिती दिली.रमाई आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतून नांदेड शहरातील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल मंजूरीबाबत माहिती देण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे यांनी आज आपल्या कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आयुक्त लहुराज माळी, उपमहापौर विनय गिरडे, स्थायी समिती सभापती शमीम अब्दुल्ला, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, नगरसेवक अमितसिंह तेहरा, दुष्यंत सोनाळे, नागनाथ गड्डम, उप अभियंता प्रकाश कांबळे, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलताना महापौर सौ.शिलाताई किशोर भवरे म्हणाल्या, नांदेड शहरामधील रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सर्व्हेक्षणासह त्रुटींची पुर्तता करुन घेवून रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३७९१ लाभार्थ्यांना घरकुलांची मंजूरी देण्यात आलेली आहे. या घरकुल लाभधारकांना बांधकाम परवानगीसाठी शुल्क माफी त्याचबरोबर नियमानुसार लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी शासनाप्रमाणेच महानगरपालिकेच्या वतीनेहह शुल्क भरण्याकरीता सुट देण्यात आलेली असून लवकरच मंजूर करण्यात आलेली घरकुले पुर्ण करुन घेण्यासाठी मनपा लाभार्थ्यांच्या सहकार्याने तत्पर आहे, असे यावेळी सांगितले.याप्रसंगी आयुक्त लहुराज माळी यांनी दोन्ही योजनेअंतर्गत यापुर्वीच्या सर्व्हेक्षणासह त्रुटी पुर्ण यादीतील पात्र लाभार्थ्यांचा प्रसिध्द यादीत समावेश नसल्यास त्यांनी प्रशासनाकडे संपर्क साधावा याबाबत त्यांची नावे समाविष्ट केल्या जातील अशी माहिती दिली. त्याचबरोबर यापुर्वी बिएसयुपी योजनेअंतर्गत गोवर्धनघाट परिसरात बांधण्यात आलेल्या घरकुलांचे अंतर्गत काम लवकरच पुर्ण करण्यात येवून ते पात्र लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून महानगरपालिका सर्वसाधारण सभेने ठराव क्रं.११६ दि.११.०९.२०१८ अन्वये लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतील बांधकाम परवानगीसाठी लागणारे शुल्क माफ केलेले आहे. तसेच शहरातील मुख्य व अंतर्गत रस्ते दुरुस्ती बाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आल्या असल्याचेही यावेळी आयुक्त लहुराज माळी यांनी यावेळी सांगितले आहे.शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ता कर व पाणी करावरील १०० टक्के शास्ती माफीच्या योजनेस दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी पर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करुन ती मुदत पुढील दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत वाढविण्यात आल्याचे माहिती देण्यात आली व या मुदतीत जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी कर भरणा करुन शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी महापौर सौ.शीलाताई भवरे व आयुक्त लहुराज माळी यांनी केले आहे