चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.
मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचे काम आहे, मी क्लिप ऐकलेली नाही, असे चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे.
चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडीओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरु असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे, असे बोलल्याचा संवाद आहे.
या विषयवार बोलताना अशोक चव्हाण म्हटले की, खाजगी संभाषण पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा विषय नाही. हे अंतर्गत विषय आहेत. चंद्रपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझे काम आहे. मी क्लिप ऐकलेली नाही, चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय आहेत. कार्यकर्ते नाराज आहेत, असेही ते म्हणाले.
चंद्रपूर लोकसभेतून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
बांदिवडेकर यांच्याबाबतचं वादळ शमलं, उमेदवारी कायम : अशोक चव्हाण
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी कायम असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. बांदिवडेकरांचा ‘सनातन संस्थे’शी संबंध असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसतर्फे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पक्षातून करण्यात येत होती. मात्र ही उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. "आम्ही बांदिवडेकरांबाबत सखोल चौकशी केलेली असून त्यांचा देखील खुलासा प्राप्त झाला आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत निर्माण झालेलं वादळ शमलेलं आहे. त्यांची उमेदवारी कायम आहे”, अशी माहिती चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’ सोबत बोलताना दिली आहे.
बांदिवडेकर यांच्यावर वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही. माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं होतं.