नांदेड – दीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यातील काही तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. शेतातून घराकडे परतणाऱ्या शेतकऱ्याचा आणि एका बैलाचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.गंगाराम लक्ष्मण बोलकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
भोकर तालुक्यातील पाळज येथील रहिवाशी गंगाराम लक्ष्मण बोलकर ( वय ५०) हे लक्ष्मण रामन्ना वज्जलवार यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे ते शनिवारी म्हाळसापुर शिवारात कामासाठी गेले .दरम्यान, शेतातील कामे आटपून बैलगाडीत चारा घेवुन घराकडे येत आसताना विजेच्या कडकडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला. यावेळी बैलगाडीवर वीज पडल्याने गंगाराम बोलकर आणि एका बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच तलाठी नृसिंह रेड्डी ,बीट जमादार आत्राम, मुंडे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.