किनवट:दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यु

किनवट/(अक्रम चौहान) व्हालीबाॅलच्या सरावानंतर कोठारी नाल्यावर डब्बापार्टी करण्यासाठी गेलेल्या आकरा विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर नाल्या लगतच्या शेतक-यांच्या सतर्कतेमुळे एकाचा प्राण वाचला. सेंट मेरी इंग्लीश स्कूल गोकुंदा येथिल ते विद्यार्थी आहेत. सदर दुर्दैवी घटना रविवारी (ता.३० सप्टेंबर ) दुपारी घडली. रेती तस्करांनी अमर्याद केलेल्या उत्खननाचे हे विद्यार्थी बळी ठरले आहेत.
सेंट मेरी इंग्लीश स्कूल ही शाळा गोकुंदा या नावाने पंजिकृत असली तरी, गोकुंद्या पासून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या कोठारी (चि.) येथे प्रत्यक्षात चालु आहे. या शाळेतील जवळपास आकरा विद्यार्थी शाळेच्या परिसरात व्हाॅलीबाॅलचा दर रविवारी सकाळी ०८ ते ०२ वाजेपर्यंत नियमीत सराव करतात. रविवारी (ता.३० सप्टेबर) मध्यानच्या काळात ते कोठारी नाल्यावर डब्बापार्टीसाठी गेले होते. दरम्यान सम्यक अशोक भवरे (सारखणी), आदि नारायण बिल्लेलवार (दत्तनगर गोकुंदा) हे इयत्ता आठवीतील विद्यार्थी होते. यांच्यासह अन्य एकजण पोहण्यासाठी कोठारी नाल्यावरील रेल्वे पुलाजवळ पोहत असतांना ज्या ठिकाणी रेती उत्खन केलेल्या पंधरा ते वीस फूट खोलीच्या खड्यात गेल्यानंतर ते परत बाहेर आले नाहीत. तिसरा विद्यार्थी खड्यात बुडत असतांना इत्तर विद्यार्थ्यांनी आरडा ओरड केल्यानंतर सभोवतालचे शेतकरी धावले अन् एका विद्यार्थ्यांचा प्राण वाचवण्यात त्यांना यश मिळाले. याच नाल्यात रेती तस्करांनी प्रचंड अमर्याद खड्डेच खड्डे केले आहेत. महसूल विभागाच्या बहाद्दर अधिका-यांनी केवळ बघ्याची भूमिका अन् कार्यवाहीचे नाटक केल्याचा हा परिणाम असल्याच्या उपस्थितांमध्ये प्रतिक्रीया उमटत होत्या. मयत विद्यार्थ्यांची किनवट पोलीसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a comment