माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांना ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ जाहीर

0 2
या पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५ हजार रुपये असे आहे. विद्यापीठाने या पुरस्कारासोबतच उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षकांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यासर्व पुरस्काराचे वितरण विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये विद्यापीठात होणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कला, संस्कृती,साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार इत्यादी क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्रातील जीवनभर विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व्यक्तीची ‘जीवनसाधना गौरव’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षीचा जीवनसाधना पुरस्कार नांदेड येथील माजी खा. डॉ. व्यंकटेश रुखमाजी काब्दे यांना जाहीर झाला आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचा २४ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १७ सप्टेंबरला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप जी. म्हैसेकर यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर राष्ट्रीय ध्वजारोहण आणि त्यानंतर विद्यापीठ ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, विद्यार्थी विकास विकास विभागाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांच्यासह शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्ताने दिल्याजाणारा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ डॉ. व्यंकटेश काब्दे यांना जाहीर करून विविध पुरस्कारही यावेळी जाहीर केले.

उत्कृष्ट महाविद्यालय शहरी विभागाचा पुरस्कार नांदेड येथील नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेजला मिळाला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५ हजार रुपये असे आहे. तर ग्रामीण विभागाचा पुरस्कार भोकर येथील कै. दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे, दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख २५ हजार रुपये असे आहे. उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभागाचा पुरस्कार सेलूच्या नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एस. कुलकर्णी  यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख १५ हजार रुपये असे आहे.

तर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शहरी विभागाचा पुरस्कार नांदेडच्या श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील डॉ. एस.एन. तलबार यांना जाहीर झाला तर उत्कृष्ट शिक्षक ग्रामीण विभागाचा पुरस्कार रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयातील डॉ. एस. व्ही. यादव आणि बाभळगाव, ता. लातूरच्या कै. व्यंकटराव देशमुख महविद्यालयातील डॉ. डी. एम. कटारे यांना विभागून मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख ५ हजार रुपये प्रत्येकी असे आहे.विद्यापीठ परिसरातील संकुलीय शिक्षक पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र संकुलातील डॉ. डी.एम. खंदारे  यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, विद्यापीठ स्मृतीचिन्ह आणि रोख १० हजार रुपये असे आहे. या पुरस्काराचे वितरण विद्यापीठ वर्धापनदिनानिमित्ताने विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात होणार आहे.