भाजप महानगर अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांची मागणी
नांदेड (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाने जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याला विरोध केला होता. परंतु, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.3) होत असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमापासून विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दूर ठेवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केली आहे.जायकवाडी जलाशयात निर्माण झालेली तुट भरून काढण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार 8.99 टीएमसी पाणी नगर व नाशिक येथील धरणांमधून सोडण्यात येणार होते. परंतु, त्याला नगर व नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला. वास्तविक मराठवाड्याला आपल्या हक्काचे पाणी मिळणे आवश्यक असताना, केवळ स्वतःचे कारखाने जगवण्यासाठी तेथील मंडळी मराठवाड्यावर अन्याय करण्याची भूमिका घेत होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मराठवाड्याच्या बाजूने निकाल दिल्यामुळे संबंधित नेत्यांचा मुखभंग झाला आहे. न्यायालयीन लढाईत हारलेल्या या नेत्यांनी आता मराठवाड्यात येऊन आमच्या जखमेवर मीठ चोळू नये, असा सल्ला संतुकराव हंबर्डे यांनी दिला आहे. पाण्याच्या प्रश्नावर प्रादेशिक वाद निर्माण करून केवळ स्वतःचे हित जोपासणार्या विखे पाटील यांना राज्याचे विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याचा देखील नैतिक अधिकार नाही, असे मतही हंबर्डे यांनी व्यक्त केले आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या छ. शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी (दि.3) होत आहे. या कार्यक्रमाला छ. शाहू महाराजांचे वंशज श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रामदास कदम तसेच विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणे ही बाब स्वागतार्ह आहे. तसेच खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीलाही आमचा विरोध नाही. परंतु, पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीला मात्र आमचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयातही त्यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्याने या प्रकरणात धाव घेतली. परंतु, न्यायालयाने मराठवाड्याच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विखे पाटील यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवावे, तसेच या प्रकरणात विखे पाटील यांनी मराठवाड्याची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केली आहे.