नांदेड – कमी किमतीत सोन्याची नाणी देतो म्हणून पितळी धातूचे नाणी देऊन लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नांदेड येथील श्रावस्तीनगर भागातून पोलिसांनी या टोळीस अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एक सोन्याचे नाणे आणि २०९ पितळी धातूची नाणी जप्त केली आहे.याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदी दिघोरे यांनी मंगळवारी रात्री गस्त सुरू केली. आपले सहकारी राजू पांगरीकर, तानाजी शेलके, बालाजी सातपुते, घुंगरू सिंग टाक, शेख जावेद, जसवंत सिंग साहू यांना सोबत घेऊन त्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसर गाठले. तेथील एका बोळीत अंधारामध्ये तिघेजण आढळून आले.पोलीससमोर दिसताच टोळीतील दोघे जण पसार झाले. तर हिम्मत गणपत जाधव राहणारा पिंपळगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ याला अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी एक सोन्याचा नाणे, २०९ पितळी धातुची नाणी आणि १ ते दीड हजार रुपये जप्त केले.
आरोपी जाधव यांनी नायगाव येथील शेख अलीम शेख खाजा यांच्याकडून सोन्याची नाणी देतो म्हणून ३ लाख रुपये घेऊन नाणी देऊन फसवणूक केल्याचे सांगितले. यवतमाळ, पुसद, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात अनेकांची फसवणूक केल्याचे त्याने सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक विनोदी दीघोरे यांनी त्याला वजिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.