नांदेड – सावकाराचे पैसे परत करुनही जमीन परत न देणाऱ्या सावकाराविरुद्ध एका शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी यावर कोणतेही पाऊल उचलले नाही. उलट या शेतकऱ्याला सावकाराच्या धमक्याच मिळत होत्या. तुझ्या कुटुंबाला एचआयव्हीचे इंजेक्शन देतो, अशी धमकी सावकार शेतकऱ्याला देत होता. या साऱ्या गोष्टीचा ताण घेऊन १६ नोव्हेंबर रोजी या शेतकऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. या सर्व प्रकाराला संबंधित सावकार आणि पोलीस जबाबदार असल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी केली. याप्रकरणी संबंधित सावकाराविरुद्ध सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिडको भागात राहणारे सुरेश गिरडे यांनी संजय नागरगोजे आणि माधव कागने या सावकाराकडून १ लाख ५० हजार रुपयाचे कर्ज घेतले होते. या बदल्यात गिरडेने आपली १ एकर जमीन या दोन्ही सावकाराकडे गहान ठेवली होती. कालांतराने गिरडे यांनी सावकाराचे १ लाख ५० हजार रुपये परत केले. मात्र, सावकारांनी गिरडेच्या कुटुंबाला त्रास देण सुरुच ठेवले. सातत्याने मिळत असलेल्या धमक्यामुळे गिरडे यांच्या पत्नीने ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत १२ नोव्हेंबर रोजी रितसर तक्रार केली होती. परंतु, सावकाराविरोधातील केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोपी सावकारांची हिंमत वाढली आणि आरोपीनी गिरडे यांच्या कुटुंबाला धमकावणे सुरुच ठेवले. या धमक्यामुळे सुरेश गिरडे घाबरून गेला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला.आपल्या कुटुंबाला धमक्या मिळत असल्याचा लेखी अर्ज सुमित्रा बाईंनी पोलीस ठाण्यात जाऊन १२ नोव्हेंबरला दिला होता. परंतु, सावकारांच्या वजनापुढे पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. आरोपीच्या धमक्यामुळे दहशतीत जगणाऱ्या सुरेशचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला होता. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. या साऱ्या दबावानंतर रात्री ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला.पूर्वकल्पना दिल्यानंतर कुठलाही गुन्हा घडता कामा नये हे पाहणे पोलिसांच काम असते. मात्र, नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी सारे संकेत धाब्यावर बसवत आरोपीला अभय दिले आहे. त्यामुळे निष्पाप सुरेशचा बळी गेला. या घटनेनंतर दोषी पोलिसांवर आणि सावकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरेशच्या नातेवाईकांनी केली आहे