शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी : परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

नांदेड दि. 28 :- 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार असून यासाठी अद्ययावत तयारी प्रशासनाने सुरू केली असून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यवस्थे संदर्भात बैठक घेण्यात आली.

16- नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा अनुसार स्ट्राँग रूम मध्ये सध्या मतपेट्या कुलुपबंद आहेत. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या बंद आहेत.त्याच ठिकाणी मतमोजणीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मतमोजणीची व्यवस्था करताना निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी ,तसेच जनतेला माहिती देणारी माध्यमे यांच्या महत्त्वाच्या भूमिका व जबाबदाऱ्या असतात. त्यांच्या संदर्भातील व्यवस्थेचा आज आढावा घेण्यात आला.

सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवस पासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्राँग रूम मध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच 24 तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

चार जूनला सकाळी सात वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष केली जाते. माध्यमांना याबाबत माहिती दिल्या जाते. माध्यमामार्फत वृत्तपत्र व वाहिन्यांद्वारे या संदर्भातील वृत्त संकलन केले जाते.

आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली.आज झालेल्या या बैठकीला व पाहणी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्यासह विविध विभाग प्रमुख व सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

मतमोजणी केंद्र परिसरात 4 जून रोजी 144 कलम लागू

नांदेड दि. 28 :- नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर नांदेड येथे सकाळपासून होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

माहिती व तंत्रज्ञान इमारत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय बाबानगर नांदेड या मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे (संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे अधिकृत रेकॉर्डिगसाठी वापरले जाणारे कॅमेरे वगळता) यांच्या वापरासाठी, तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन व मतमोजणीच्या कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी तसेच, मतमोजणी केंद्रापासून 100

मीटरच्या आतमधील क्षेत्र हे पादचारी क्षेत्र राहील ज्यामध्ये वाहनांच्या हालचालीसाठी सुध्दा या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश मंगळवार 4 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून 16-नांदेड लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading