अ.भा.काँग्रेस कमिटीचे निरिक्षक नांदेडात दाखल; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक
नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकींसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणण्याची तयारी काँग्रेस पक्षाने सुरु केली आहे. याच अनुषंगाने नांदेड लोकसभा मतदार संघाचा उमेदवार ठरविण्यासाठीची महत्वपूर्ण बैठक उद्या दि.23 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीेचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी माजी आ. संपतकुमार यांच्या उपस्थितीत होणार असून याच बैठकीत आगामी लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार ठरणार असल्याचे कळते.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभा उमेदवारांच्या दृष्टीने चाचपणी चालू आहे. लोकसभेचा उमेदवार ठरवितांना काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मते जाणून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी यांनी मतदारसंघ निहाय पक्ष निरिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. महाराष्ट्रात सुध्दा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूकीची पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्यावतीने लढविण्यात येणार्या जागांवरील संभाव्य उमेदवारांची चाचपणी घेण्यात येत आहे. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून 2014 च्या मोदी लाटेत सुध्दा काँग्रेसने ही जागा तब्बल 82 हजार मताधिक्यांनी जिंकली होती. आता नांदेड लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे खा.अशोकराव चव्हाण यांच्यावर पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी टाकली आहे. त्यांना राज्यातील काँग्रेस पक्षाच्या इतर उमेदवारांना विजयी करण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा लागणार आहे. अशा वेळी या मतदार संघातून लोकसभेसाठी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या दि.23 रोजी सायं.4 वाजता येथील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहामध्ये नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीेचे पदाधिकारी, ब्लॉक कमिटीचे पदाधिकारी, बुथ कमिटीचे सदस्य व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे नियोजन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे. या बैठकीस माजी राज्यमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगावकर, महापौर सौ.शिलाताई भवरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या महत्वपूर्ण बैठकीस शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, मनपा, नगर पालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर पंचायतचे सर्व सदस्य, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, बुथ कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.