नांदेड (प्रतिनिधी), दि.25ः राफेल विमान खरेदीप्रकरणी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या वेळी पक्षाच्या काही जबाबदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरून घोषणाबाजी केली. त्यामुळे पंतप्रधानांचा अवमान करणार्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती महानगर भाजपचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी दिली. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) आ. राम पाटील रातोळीकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.नरेंद्र मोदी हे भाजपचे सर्वोच्च नेते असून, देशाचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचा उचित सन्मान राखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. परंतु, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना याचेदेखील भान राहिलेले नाही. गेल्या चार-साडेचार वर्षांत सत्तेपासून दूर राहिल्यामुळे काँग्रेसची नेतेमंडळी अस्वस्थ झाली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे. परंतु, अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधानांविषयी अपमानजनक भाषा वापरणे पूर्णतः चुकीचे आणि अनैतिक आहे. काँग्रेसने एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राफेल प्रकरणी खोटा प्रचार सुरू केला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असेही डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी म्हटले आहे.
सोमवारी आंदोलनाच्या वेळी शिवराळ भाषा वापरून पंतप्रधानांविषयी अपमानास्पद घोषणा देण्यात आल्या. त्याची व्हिडीओ क्लीप प्राप्त झाली आहे. त्यानुसार या क्लीपची चौकशी करून संबंधित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भाजपच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे. तसेच पोलिसात रीतसर तक्रारदेखील नोंदविली जाईल, असेही हंबर्डे यांनी या वेळी सांगितले. काँग्रेसने यानिमित्ताने केलेल्या घोषणाबाजीला आम्हीदेखील जशास तसे उत्तर देऊ शकतो. परंतु, ती आमची संस्कृती नाही. त्यामुळे कायदेशीर मार्गानेच आम्ही जाणार आहोत, असेही डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.