नांदेड -किनवट तालुक्यातील उमरी येथील बाल गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील विनापरवाना डीजे पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी ४ तास रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी डीजे परत केल्यानंतरच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २२ सप्टेंबरला किनवट तालुक्यातील उमरी बाजार येथे एका बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मात्र या मंडळाने कोणतीही परवानगी न घेता विसर्जन मिरवणुकीत मोठ्याने डी.जे लावला होता. या डी.जेच्या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होत असल्याने नागरिकांनी याबाबतची तक्रार मांडवी पोलिसांकडे केली होती. दाखल झालेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित गणेश मंडळाचा डी.जे ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संतापलेल्या गणेश भक्तांनी मांडवीच्या मुख्य रस्त्यावर ४ तास रस्ता रोको आंदोलन केले. तसेच जोपर्यंत डीजे परत करत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही आणि गणपतीचेही विर्सजन करणार नाही असा पवित्रा गणेश भक्तांनी घेतल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले होते. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या विचाराने सहाय्यक पोलीस निरिक्षक केंद्रे यांनी दुपारी ५ वा.च्या दरम्यान जप्त केलेला डीजे परत दिला. त्यानंतर पुन्हा डीजेच्या तालात विसर्जनाची मिरवणुकीस सुरुवात झाली आणि गणपतीचे विसर्जन झाले.