शहरात स्वतंत्र महिला रुग्णालय नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला रुग्णाची अडचण होत होती. ही अडचण लक्षात घेता, आमदार बाबजानी दुराणी यांनी विधानपरिदेमध्ये तारांकित प्रश्नाद्वारे स्वतंत्र महिला रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती. परभणी येथील महिला रुग्णालय जागेअभावी जिल्हा सामान्य रुग्णालयातच सुरू करण्यात आलेले आहे. परंतु, स्वतंत्र रुग्णालयाच्या उभारणीसाठी होत असलेले वेळकाढू धोरणामुळे जिल्हाभरातील रुग्णात नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत शासनाने कोणती कारवाई केली, असे त्या प्रश्नात म्हटले होते.
या प्रश्नी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी त्यास लेखी उत्तर दिले, जागेअभावी जिल्हा सामान्य रुग्णालयात हे स्त्री रुग्णालय चालवावे लागले होते. मात्र, आता स्त्री रुग्णालयासाठी परभणी दर्गा रोड येथे अडीच एकर जागा उपलब्ध झाली आहे. त्यासाठी 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्या कामाच्या अंदाज आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, काम सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले असल्याची माहिती देखील आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली.