देवी विसर्जनादरम्यान दोन मंडळांचे कार्यकर्ते भिडले, एका तरुणाचा मृत्यू

मुंबई – दादर चौपाटीजवळ काल रात्री १. ३० वाजताच्या सुमारास देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांत जोरदार भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की या भांडणाचे पर्यवसान मारहाणीत झाले. दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. या मारहाणीत एका तरुणाचा उपचारादरम्यान केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. काल अनेक सार्वजनिक मंडळांच्या देवीचा विसर्जन सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्याला दादर परिसरात गालबोट लागले आहे. मानखुर्द येथील जय भवानी महिला उत्सव मंडळ आणि धारावी येथील जय अंबे मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणूक दादर चौपाटीवर येत असताना या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादात जय भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जय अंबे मित्र मंडळाच्या अविनाश अशोक नलावडे (वय – १९) आणि स्टेलिन यशवंत पुजारी (वय १९) यांनी बेदम मारहाण केली. ही घटना काल रात्री १.३० वाजताच्या सुमारास सी ५ लेन येथे घडली. त्यानंतर घटनास्थळी शिवाजी पार्क पोलिसांचे पथक पोहचले आणि गंभीर जखमी झालेल्या जगदीशला केईएम रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश आणि स्टेलिनला भा. दं. वि. कलम ३०७ अन्वये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अटक करण्यात आली. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी जगदीशचा मृत्यू झाल्याने या दोघांवर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading