लाईफटाईमसाठी 1000 रुपये मोजले…मग आता पुन्हा 35 रुपये कशासाठी?

मुंबई : साधारण 15-16 वर्षांपूर्वी देशात मोबाईल सेवेने बाळसे धरले होते. यावेळी सिमकार्डही सहजासहजी मिळत नव्हते. मिळालेच तर तब्बल 1000 रुपये मोजून लाईफटाईम व्हॅलिडिटी दिली जात होती. अनेकांनी एवढी रक्कम भरून सरकारी दूरसंचार कंपनीसह खासगी कंपन्याची सिमकार्ड घेतली होती. यावेळी इन्कमिंग मोफत दिले जात होते. मात्र, आता दर महिन्याला 35 रुपयांचे रिचार्ज करण्याची बळजबरी करण्यात येत असून न केल्यास आऊटगोईंगसह इनकमिंगही बंद करण्यात येत आहे. ट्रायने तंबी देऊनही कंपन्या मनमानी कारभार करत आहेत. या लुटीबाबत एका ग्राहकाने आयडीया या टेलिकॉम कंपनीच्या प्रतिनिधीला जाब विचारला. मात्र, त्यांना याबाबतचा खुलासा करता आलेला नाही.
एका ग्राहकाने आयडियाच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी फोन करून चर्चा केली. यावेळी ग्राहकाने त्यांना लाईफटाईम व्हॅलिडीटीच्या सुविधेसाठी 2005 मध्ये 500 आणि 1000 रुपये आकारले होते. या पैशांचे काय झाले याबाबत जाब विचारला. एवढे पैसे घेऊनही आता 35 रुपये का आकारले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधीने बिनबुडाची उत्तरे देत नवीन नियम आल्याची टेप सुरुच ठेवत उत्तर देण्याचे टाळले. या सजग ग्राहकाने मागच्या पैशांचे काय, लाखो ग्राहकांकडून तेव्हा करोडोंनी पैसे गोळा केले त्याचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. यावर त्या प्रतिनिधीने आमच्याकडे तीन महिन्यांचीच माहिती उपलब्ध असल्याचे उडवाउडवीचे उत्तर दिले. तसेच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसल्याचे सांगत आता 2018 साल सुरु असून तुम्ही 2007 ची माहिती मागत असल्याचे उलट उत्तर दिले. तसेच 35 रुपयाचे रिचार्ज केल्यावरच फोन सेवा सुरु होईल असे सांगितले. यावर ग्राहकाने आयडियामध्ये सिमकार्ड कधी घेतले याबाबत विचारले असता त्यांनी 2003 मध्ये सिम खरेदी केल्याचे मात्र अचूक सांगितले. मग 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य आहे का असे विचारल्यावर मात्र, त्या प्रतिनिधीने 1000 रुपयांचे रिचार्ज केल्याचे मान्य नसल्याचे सांगत हात झटकले. तसेच तुम्ही आजवर हजारो रिचार्ज केली असतील, आता ते कसे शोधणार असे सौम्य भाषेत सांगत उत्तर देण्याचे टाळले. यावर कंपन्या लुटालूट करत असून आमची माहीतीही लपवत असल्याचा आरोप करत ग्राहक मंचात जावे लागेल असा इशारा या ग्राहकाने दिला.

اپنی رائے یہاں لکھیں

Discover more from ورق تازہ

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading