नांदेड – अर्धापूर तालुक्यातील मालेगाव या ग्रामपंचायतीने शिक्षण क्षेत्रातील एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ग्रामपंचायतीने शाळेमध्ये मोबाईल वापरण्यावर बंदी केली आहे. हा ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे.मालेगाव ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या परिपत्रकाच्या प्रति गावातील सर्वच शाळांना आणि अर्धापूरचे गटशिक्षण अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच ग्रामपंचायतीने हा प्रयोग सुरू केल्याने या निर्णयाचे पालकवर्गातून आणि ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे. मालेगावमध्ये २ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, तर ६ खासगी संस्थांच्या शाळा आहेत. या शाळेतील शिक्षक शालेय वेळेत वर्गात शिकवणी चालू असतानाच मोबाईलवर तासनतास बोलताना अनेकदा दिसून आले, तर काही शिक्षक मोबाईलवर व्हॉटस्अॅप , फेसबुकसह इतर सोशल मीडियाचा वापर करताना आढळले आहेत. काही शिक्षक तर चक्क मोबाईलवर गेम खेळताना आढळले होते.शिक्षकांच्या वर्तनामुळे पालकांकडून याबाबत कमालीची नाराजी व्यक्त केली जात होती. त्यासंबंधी काही पालकांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार दिली. ग्रामपंचायतीने तात्काळ ठराव घेऊन मोबाईल वापरास बंदीबाबतचे परिपत्रक काढले. तसेच हे परिपत्रक शासकीय आणि खासगी शाळांना देण्यात आले. या परिपत्रकात शालेय वेळेत मोबाईलचा वापर बंद करावा, मोबाईल फोन वापरताना आढळ्यास ग्रामपंचायत याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करत अशा शिक्षकांवर कारवाईची मागणी करेल. याबाबतचा प्रस्ताव करण्यात असल्याची माहिती सरपंच उज्वला इंगोले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. देशमुख यांनी दिली. परंतु या निर्णयाचे किती शिक्षक पालन करतील हे काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल.


اپنی رائے یہاں لکھیں