पुणे, दि. ८ सप्टेंबर २०१८:सनातनसारखी कट्टरवादी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपले मधूर संबंध असल्याचे सांगते. कदाचित त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करायला राज्य सरकार तयार नाही, असा आरोप करून सरसंघचालक मोहन भागवत यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सनातनशी नेमके काय संबंध आहेत; ते जाहीर करण्याचे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपीय सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सनातनचे डॉ. जयंत आठवले यांनी अनेकदा लोकांना नक्षलवादी, दहशतवादी बनण्याचे आवाहन केले आहे. राजकीय नेत्यांना ठार मारण्याची आणि राजकीय व्यवस्था उलथवून लावण्याची भाषा वापरली आहे. यासंदर्भातील त्यांची चिथावणीखोर विधाने त्यांचेच मुखपत्र सनातन प्रभातमधून प्रसिद्ध झाली आहेत. हा एक ठोस पुरावा असून, पुरोगामी विचारवंतांप्रमाणेच या पुराव्यांच्या आधारे पोलीस डॉ. जयंत आठवले यांना अटक करणार का? असा खडा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला