नांदेड-नागपूर महामार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू
दाभड येथील युवक दुचाकी (क्र- एम.एच-२६ ए.एच.-४१३७) नांदेडला जात होते. खडकूतपाटीजवळ नांदेडहून अर्धापूरकडे जाणाऱया ट्रक (क्र-एम.एच-२६ एच ५८३३) खड्डे असल्यामुळे दुभाजक ओलांडून चुकीच्या मार्गाने समोर आला. यामुळे सदरील दुचाकीची आणि ट्रकमध्ये धडक झाली. यात नंदकुमार संभाजी कदम (वय-२२), यूनुस इकबाल शेख (वय-२७), अरबाज इकबाल शेख (वय-१९) हे गंभीर जखमी झाले. यात नंदकुमार कदम यांना जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, यूनुस इकबाल शेख याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नागपूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर मोठे खड्डे पडले असून अनेक अपघात झाले तरीही सबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
यावेळी वसमत फाटा येथील महामार्ग पोलिसांनी जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी जमली होती. यावेळी बराच वेळ वाहतूकही खोळंबली होती.