अल्पवयीन बालिकेची छेड करणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला दया दाखवून दिली शिक्षा
नांदेड (प्रतिनिधी) चार वर्षांपुर्वी एका अल्पवयीन बालिकेला त्रास देणाऱ्या अभियांत्रिकी विद्यार्थ्याला आज तिसरे जिल्हा न्यायाधीश ए.जी. सय्यद यांनी त्याच्या भविष्यासाठी दया दाखवत सहा महिने सक्तमजुरी आणि 2500 रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली.
नांदेड शहराच्या पुर्व कोपऱ्यात राहणाऱ्या एका कॉलनीमधील मुलगी दररोज शिकवणीसाठी कौठा परिसरात जात होती. त्या भागात जाताना असणाऱ्या र्निमनुष्य परिस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला संदेश मालू जोंधळे (20) रा. वसरणी, हा तिला नेहमी सतावत असे, याबाबत त्या 15 वर्षीय बालिकेने आपल्या घरच्या मंडळीला सांगितले. दि. 12 मे 2014 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ही बालिका आपल्या दररोजच्या शिकवणीसाठी आपल्या स्कुटीवर बसून निघाली असताना काही अंतर ठेऊन तिचे वडील पण तिच्या मागे निघाले. बालिका कौठा येथील साई कमान येथे पोहचली तेव्हा दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 ए.ई. 3410 या गाडीवर आलेल्या 20 वर्षीय युवकाने त्या बालिकेला बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिने नकार दिला तेव्हा तो युवक तिला घाण शिव्या देऊ लागला. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून हा या युवकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला.
पोलिस हवालदार सुरेश वाघमारे यांनी या प्रकरणातील युवक संदेश मालू जोंधळे याच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. दोषारोपात महिलेचा विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याचाही उल्लेख होता. या खटल्यात सात साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयासमक्ष नोंदविले. उपलब्ध पुराव्याआधारे तिसरे जिल्हा न्यायाधीश ए.जी. सय्यद यांनी संदेश मालू जोंधळेला कलम 354 (अ) सहा महिने सक्तमजुरी, 1 हजार रूपये रोख दंड, कलम 354 (ड) प्रमाणे तीन महिने सक्तमजुरी 500 रूपये रोख दंड आणि पोस्को कायद्याच्या कलम 12 प्रमाणे सहा महिने सक्तमजुरी आणि 1 हजार रूपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या तिन्ही शिक्षा संदेश जोंधळेला सोबत भोगावयाच्या आहेत. या प्रकरणात निकाल देताना न्या. सय्यद यांनी संदेश जोंधळेच्या जीवनातील पुढील भविष्याचा विचार करून दाखविलेली दया महत्वपूर्ण आहे. पण त्याने केलेल्या चुकीची शिक्षा न्यायालयाने त्याला दिली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्या ऍड. डी.जी. शिंदे यांनी बाजू मांडली तर आरोपी संदेश जोंधळेच्यावतीने ऍड. नितीन सोनकांबळे यांनी काम पाहिले. या खटल्यात पेरावी अधिकाऱ्याची भूमिका नांदेड ग्रामीणचे पोलीस हवालदार फैयाज सिद्दीकी यांनी बजावली.
news by:nandednewslive.com