सोमवारच्या भारत बंदवरून काँग्रेसमध्येच फाटाफूट? गोव्यात बंद नाही

0 14

मडगाव : इंधनाच्या आणि स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवार 10 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. मात्र, या निर्णयावरून पक्षातच फाटाफूट दिसून येत आहे. भारत बंदमध्ये गोव्यातील काँग्रेस पक्ष सहाभागी होणार नसल्याचे काँग्रेसचे गोवाप्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीसाठी गावागावातून लोक येणार आहेत. त्यांना त्रास होऊ नये म्हणून गोव्यामध्ये बंद पाळला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 चोडणकर म्हणाले, गणेशोत्सव हा गोवेकरांचा मुख्य सण आहे. या सणासाठी तीन-चार दिवस आधी खरेदी सुरु होते. या सणाचे महत्व लक्षात घेऊन गोव्यातील काँग्रेस बंदमध्ये भाग घेणार नाही. या उलट सोमवारी या इंधनवाढी विरोधात आम्ही लोकांमध्ये जागृती करु.
13 सप्टेंबर रोजी चतुर्थीचा सण असून 12 सप्टेंबरपासून या सणाच्या धार्मिक विधी गोव्यात सुरु होतील. चतुर्थी हा महत्वाचा सण असल्याने गोव्यात त्या दिवसात बाजारपेठांनाही तेजी आलेली असते. अशा परिस्थितीत बंदची हाक दिल्यास लोकांना त्रास होईल. यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार हे गोव्यात आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्थानिक भाजपा सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला असला तरी सोमवारी बंद पाळल्यास लोकांची सहानुभूती काँग्रेसपासून दूर जाण्याची शक्यता असल्यानेच हा बंद पाळला जाऊ नये अशी विनंती विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनीही केल्याचे समजते.

गोव्यात बंद पाळण्याऐवजी काँग्रेस पक्ष सर्व पेट्रोल पंपवर पत्रके वाटून  लोकांमध्ये जागृती करणार आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

यावेळी प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते. सका़ळी 9 ते 10 या वेळेत राज्यातील एकूण एक पेट्रोलपंपवर काँग्रेस कार्यकर्ते ही मोहीम राबवतील व सरकार इंधनाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास कसे अपयशी ठरले आहे ते लोकांना पटवून देईल. ते म्हणाले की, 2014  मध्ये संपुआ सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 52 रु. लिटर, डिङोलचे 47 रु. तर गॅसचा दर 380 रु. होता. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचे सावट असताना हे दर गगनाला भिडलेले आहेत व त्याचा सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसत आहे, असा दावा त्यांनी केला
by lokmat.com