बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर! भाजप

भाजप महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा आरोप
नांदेड (प्रतिनिधी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे होमटाऊन असलेल्या नांदेडमध्ये भारत बंद यशस्वी होण्यासाठी काँग्रेसकडून दबावतंत्राचा वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केला आहे.
इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत कमी-जास्त होते. त्या आधारेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरत असतात, हे सर्वसामान्य जनतेला माहित आहे. त्यामुळे जनता बंद करण्याच्या मनःस्थितीत नाही. स्थानिक पातळीवर काँग्रेसने सत्तेचा दुरूपयोग केला. तसेच व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, ऑटोरिक्षा आणि स्कूल बसचालक संघटना यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला, असा आरोप डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केला.
नांदेड काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असल्यामुळे येथे बंद यशस्वी झाल्याचे दाखविण्यासाठी काँग्रेसच्या दोन आमदारांनी व्यापारी संघटना तसेच शैक्षणिक संस्थाचालकांशी व्यक्तिगतरीत्या संपर्क साधून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अशा तिखट शब्दात भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी काँग्रेसच्या बंदबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वास्तविक सोमवारच्या भारत बंदला नांदेडमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे काँग्रेसला जनतेचे समर्थन नाही, हे सिद्ध होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.