साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन रद्द करण्याची डाव्या लोकशाही आघाडीची मागणी

नांदेड/प्रतिनिधी-शहीद हेमंत करकरे यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणार्‍या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन अर्ज रद्द करुन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीच्या एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेनीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे हे शहीद झाले आहेत. बॉम्ब स्फोट प्रकरणी न्यायालयातून जामीनावर सुटलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. या आक्षेपार्ह विधानाचा डाव्या लोकशाही आघाडीच्यावतीने निषेध करण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा जामीन तात्काळ रद्द करुन त्यांना अटक करावी. तसेच हेमंत करकरे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधाना प्रकरणी त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या निवेदनावर भाकपचे जिल्हासचिव कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ.गंगाधर गायकवाड, बालाजी कलेटवाड (माकप), कॉ.श्याम सोनकांबळे, गणेश संदुपटला, प्रा.सय्यद रहेमान, स. मुसाभाई, संतोष शिंदे यांच्या सह्या आहेत.