लोह्यात चिखलीकरांचे ‘कमळ’ फुलणार की चव्हाणांच्या ‘हाताची’ जादू कायम राहणार…?

0 15

नांदेड – लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत असली तरी ‘धनुष्यबाण’ ही ‘हातात’ सज्ज आहे, तर ‘घड्याळाचे’ काटे जागेवरच थांबले आहेत. त्यामुळे आपोआपच ‘घडी’ ही ‘हाता’लाच बांधली जाईल असे चित्र आहे. म्हणून पुन्हा एकदा ‘सर्वजण मिळून’ चिखलीकर यांना घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. एकंदरीत निवडणुकीला चांगलाच रंग भरला असून लोह्यात चिखलीकरांचे ‘कमळ’ फुलणार की चव्हाणांच्या ‘हाताची’ जादू कायम राहणार, याबाबत उत्सुकता कायम आहे.जिल्ह्यातील लोहा नगरपालिका शिवसेनेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात येते. नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान चिखलीकर यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. तेंव्हापासून त्यांनी भाजपचे ‘कमळ’ हातात घेतले असून कमळाच्या निशाणीवरच लोहा नगरपालिकेतील सर्व उमेदवार उभे केले आहेत.

लोहा मतदारसंघ चिखलीकर यांचा बालेकिल्ला असला तरी मागच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘मनसे’च्या मागे आपली ताकद लावून माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या माध्यमातून सत्तेवर बसविले. कालांतराने माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसनेही आपली ‘मूळं’ मजबूत केली आहेत. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही भक्कम पाठिंबा असतोच.लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत ८ प्रभाग असून भाजप-१८, काँग्रेस-१६, शिवसेना-०५, राष्ट्रवादी-०४, इतर-१५ असे एकूण नगरसेवक पदासाठी ५८ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून पदासाठी भाजप, काँग्रेस, बहुजन विस्थापित आघाडी, अपक्ष असे ४ उमेदवार रिंगणात आहेत.
लोहा नगरपालिकेसाठी येत्या रविवारी मतदान होणार आहे.सुरुवातीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होईल अशी शक्यता होती. पण ती ऐनवेळी फिस्कटली. पण राष्ट्रवादीचेही बळ कमी पडले असून त्यांना केवळ ४ ठिकाणीच उमेदवार मिळाले आहेत. तसेच शिवसेनेचेही केवळ ५ ठिकाणी उमेदवार आहेत. शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतली असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना व राष्ट्रवादी या दोघांचेही उमेदवार नाहीत. त्यामुळे काँग्रेसने या वातावरणाचा लाभही आपल्या बाजूने कसा घेता येईल यासाठी ‘दुश्मन का दुश्मन अपना दोस्त’ अशी ‘हात’मिळवणी करून धनुष्यबाणाने व घड्याळाच्या काट्याने ‘कमळा’च्या ‘पाकळ्या’ छाटण्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विश्वासू व कट्टर समर्थक आमदार अमरनाथ राजूरकर लोह्यात तळ ठोकून 

आहेत. ‘मिळून सारे एक होऊ’चा प्रयोग पुन्हा एकदा सुरू केला आहे. लोह्यातील गत निवडणुकीचा ‘प्रयोग’ पुन्हा यशस्वी करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही या प्रयोगाला उत्तर देण्यासाठी सर्व निवडणूक नीतीचा अवलंब सुरू केला आहे. ‘हाता’ला ‘अमरवेल’ संजीवनी देईल की ‘कमळा’चा ‘प्रताप’ घडेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेवटच्या टप्प्यात ‘लक्ष्मी’च्या दर्शनावर बरेच काही अवलंबून असल्याचे ‘मत’ व्यक्त होत आहे